नवी दिल्ली : देशात आता सोने खरेदीदारांची फसवणूक करता येणार नाही. हॉलमार्कशिवाय देशात सोने विक्री (Gold Hallmarking) करता येणार नाही. केंद्र सरकारने त्यासाठी खास नियम तयार केला आणि त्यांची अंमबजावणी पण सुरु झाली. 1 एप्रिल 2023 पासून हा नियम लागू करण्यात आला. त्यानुसार, देशातील सोन्या,चांदीचे दुकानदार, सराफा, पेढीवाले यांना 6 अंकी HUID Hallmarking चे दागिने, आभुषण विक्री करावी लागेल. अन्यथा त्यांच्यावर कारवाई होईल. पण तुमच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांचे काय होणार, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या दागिन्यांवर तर ‘अल्फान्यूमेरिक एचयूआईडी’ चे चिन्ह नाहीत. मग तुम्हाला हे दागिने विक्री करता येतील का?
हॉलमार्क क्रमांक अनिवार्य
ग्राहक मंत्रालयाने सोने आणि दागिन्यांच्या खरेदी विक्रीसाठी नियमात बदल केला. हॉलमार्क क्रमांकाशिवाय सोन्याची विक्री न करण्याचे धोरण ठरवण्यात आले. 1 एप्रिलपासून हा नियम लागू झाला. नवीन नियमानुसार, 31 मार्च, 2023 नंतर चार अंकी हॉलमार्क युनिक ऑयडेंटिफिकेशन (HUID) आभुषणे आणि दागिने खरेदी-विक्री करता येणार नाही. 1 एप्रिलपासून सहा आकडी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग दागिनेच मान्य राहतील.
खरे सोने कसे ओळखाल
सोन्याची दागिन्यांची खरेदी करताना त्यावरील BIS हे चिन्ह जरुर तपासा. हे चिन्ह एका त्रिकोणासारखे दर्शविल्या जाते. तुमच्या दागिन्याच्या बिलावर हॉलमार्किंगचे मूल्य, किंमत जरुर तपासा. त्यानुसार, तुम्हाला किती कॅरेटचे सोने मिळाले. तुम्ही खरेदी केलेले सोने किती शुद्धतेचे आहे, हे समोर येईल. सोन्याच्या घडवणीसाठी आणि शुद्धतेसाठी तु्म्ही किती रुपये मोजले हे तुमच्या लक्षात येईल. सोने खरेदी करताना ते कमीत कमी 22 कॅरेट शुद्धतेचे असणे आवश्यक आहे. देशात आता सोने आणि दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे.
हेच सोने का खरेदी करावे
सोन्याची हॉलमार्किंग त्याच्या शुद्धतेची हमी देते. त्यामुळे तुम्हाला खरे आणि खोटे सोने याच्यातील फरक, तफावत लक्षात येते. देशात सोन्याच्या शुद्धतेसाठी आता हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे दागिने, आभुषणे तयार करण्यासाठी आता 22 कॅरेट सोन्याचा वापर, उपयोग करणे आवश्यक आहे. हे सोने 91.6 टक्के शुद्ध असते. त्यामुळे तुमची फसवणूक होत नाही.
सराफा व्यापाऱ्यांना दिलासा
केंद्र सरकारने शुक्रवारी याविषयीचा दिलासा दिला. 1 एप्रिलपासून हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विक्री करता येणार नाही. पण आता सोन्याच्या विक्रीसाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. देशातील जवळपास 16,000 सराफांना जूनपर्यंत दिलासा देण्यात आला आहे. ते जुने हॉलमार्क असलेले दागिने, आभुषणे विक्री करु शकतात. केंद्राने त्यांना तीन महिन्यांसाठी ही सवलत दिली.
घरातील दागिन्यांचे काय
आता घरातील दागिन्यांचे काय होणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कारण घरातील दागिने तर पिढ्यानपिढ्या जतन केले जातात. गेल्या काही वर्षांपासून हॉलमार्कचा विषय समोर आला. त्यामुळे घरातील दागिन्यांची विक्री करता येणार की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर ग्राहकांना त्यांच्या घरातील दागिने, सोने विक्री करता येणार आहे. त्यावर हॉलमार्क नसले तरी या दागिन्यांची विक्री करता येईल. बाजारभावानुसार, त्याचे दाम तुम्हाला मिळतील.