नवी दिल्ली : Google Search वर काहीही शोधता येते. एका सेंकदांत लाखो परिणाम आपल्यासमोर येतात. गुगलबाबा आपल्यासमोर ज्ञानाचं भंडार उघडं करुन ठेवतो. तुम्हाला फक्त त्यातलं योग्य काय आहे, त्याची पारख पाहिजे. नाहीतर आयतं संकट तुम्ही ओढावून घेतात. इंटरनेटच्या (Internet) या मायाजालात अनेकदा सापळे लावण्यात येतात. ते जर वेळीच ओळखता आले नाहीतर मग बिकट प्रसंग ओढावतो. हा प्रयोग अनेकदा अंगलट येतो. गुगलबाबाचा वापर करुन अनेक जणांना मोठा दगाफटका बसला आहे. तेव्हा सावधान, हा नंबर सर्च (Number Search) करताना सजग रहा. सावध रहा, सावज होऊ नका.
हे सर्च करताना घ्या काळजी
बँकेसंबंधी काही समस्या असेल तर आपण लागलीच गुगलवर जाऊन तिचा कस्टमर केअर क्रमांक शोधतो. समोर माहितीचा पसारा पडलेला असतो. घाई एवढी असते की, कोणताही पडताळा न घेता आपण दिसेल ती वेबसाईट उघडतो. त्यावरील कस्टमर केअरचा क्रमांक डायल करतो आणि पुढे जे होते, त्यानंतर कपाळाला हात मारतो. कारण तोपर्यंत सायबर भामट्याने त्याचे इप्सित साध्य केलेले असते.
सर्चिंग हेच पहिले जाळे
कोणताही हेल्पलाईन क्रमांक शोधताना, आपण कोणाची शिकार होऊ शकतो, हे आपल्या लक्षात नसते. पण सायबर भामटे विविध फेक वेबसाईटच्या माध्यमातून त्यांचे जाळे विणून सवाज येण्याची वाट पाहतात. त्यांच्या जाळ्यात आपण अडकलो की, आपली बँकिंग माहिती काढून घेऊन ते त्याचा दुरुपयोग करतात. अवघ्या काही मिनिटात आपले बँक खाते साफ होते. त्यातील लाखो रुपयांची रक्कम छुमंतर होते.
महाठगांनी 5 हजार जणांना गंडवले
गेल्या वर्षी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) वर IFSO आणि पोलिसांनी देशभरात जवळपास 5000 जणांना गंडविल्याच्या तक्रारी प्राप्त केल्या होत्या. महाठगांनी त्यांना याच माध्यमातून त्यांना फसवलं होतं. काहींनी धनादेशासंबंधी माहितीसाठी गुगलवर त्या बँकेचा कस्टमर केअर क्रमांक शोधला. त्यांनी ज्या क्रमांकावर फोन केला. त्यांनी बँकेचे प्रतिनिधी म्हणून ओळख दिली. एक लिंक पाठवली. लिंक उघडल्यानंतर बँकेच्या वेबसाईट सारखी दिसणारी बनावट वेबसाईटवर त्यांनी लॉग इन करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एका ग्राहकाच्या खात्यातून 27.10 लाख रुपये काढण्यात आले. मोबाईलवर लिंक पाठवून ही गंडा घालण्यात आला.
50 हून अधिक फेक शॉपिंग साईट्स
दिल्ली पोलिसांच्या मते, देशात सध्या 50 हून अधिक फेक शॉपिंग साईट्स कार्यरत आहेत. तुम्ही एखादं उत्पादन खरेदी करण्यासाठी गुगलवर जाता, तेव्हा हुबेहुब त्या वेबसाईट सारखी वेबसाईट तुमच्या समोर असते. याठिकाणी माल खरेदीची ऑर्डर दिल्यानंतर तुम्हाला बँकिंग माहिती विचारण्यात येते. याठिकाणीच तुमचा घात करण्यात येतो. या संकेतस्थळावरुन आतापर्यंत 10 हजारहून अधिक लोकांना 25 कोटींचा चूना लावण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.
टॉप सर्च मधील ‘Ad’ पासून रहा सावध
दिल्ली पोलिसांच्या मते, ग्राहकांनी गुगलवर सर्च करताना ‘Ad’ या लिंकपासून दूर राहणे आवश्यक आहे. त्यांना क्लिक करु नये. ही एक जाहिरात आहे. त्याआधारे ती रँकिंगमध्ये टॉपमध्ये दिसते. तसेच बँक, वेबसाईटचे युआरएल चांगल्याप्रकारे तपासा. त्यात अगदी छोटा बदल असतो. त्यावर लक्ष ठेवा. काहीजण सरकारी योजनांच्या आधारे बनावट संकेतस्थळ तयार करतात आणि गंडावतात.