Atal Pension Scheme | असंघटित कामगारांमध्ये (Unorganized Workers) लोकप्रिय असलेल्या अटल पेन्शन योजनेत मोठा बदल करण्यात आलेला आहे. सरकारने 2015 मध्ये अटल पेन्शन योजना (Atal Pension Scheme-APY) सुरु केली आहे. तेव्हापासून या योजनेत अनेक कामगारांनी सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. या योजनेत अनेक कामगार योगदान देत आहेत. पण या योजनेत सरकारने एक मोठा बदल केला आहे. एका ऑनलाइन वेबसाइटच्या रिपोर्टनुसार(Report), एखादी व्यक्ती जर करदाता असेल तर तो अटल पेन्शन योजनेसाठी, एपीआयसाठी अर्ज करु शकणार नाही. अटल पेन्शन योजनेतंर्गत अर्जदाराला दरमहा पेन्शन दिली जाते. ही योजना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पेन्शन मिळावी यासाठी सुरू करण्यात आली होती. अहवालात म्हटले आहे की, अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry)निर्णय घेतला आहे की, जे आयकर भरतात ते अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत. अर्थ मंत्रालयाचा हा नवीन नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या निर्णयाची राजपत्र अधिसूचना 10 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली आहे. नियमांनुसार, कोणताही नागरिक जो प्राप्तिकर कायद्यांतर्गत कर भरतो, अशा करदात्याला 1 ऑक्टोबरनंतर अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करता येणार नाही. 1 ऑक्टोबरनंतर एपीवाय(APY)साठी अर्ज करणारी व्यक्ती आयकराच्या कक्षेत आल्यास, त्याचा अर्ज आणि खाते ताबडतोब बंद करण्यात येईल, असे या नियमात म्हटले आहे. पेन्शनचे पैसे खात्यात जमा असतील तर ते अशा लाभार्थ्याला परत करण्यात येतील.
अटल पेन्शन योजनेची पात्रता अथवा अपात्रतेचे नियम पाहिल्यास भारतातील प्रत्येक नागरिक त्यासाठी अर्ज करू शकतो. मात्र आता प्राप्तिकर भरणाऱ्यांसाठी या योजनेतील सहभाग रद्द करण्यात आला आहे. याविषयीचा नियम त्यांना लागू करण्यात आला आहे. APY साठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. अर्जदाराचे बचत खाते असावे, जर तुमच्याकडे आधीच खाते नसेल तर तुम्हाला बचत खाते उघडावे लागेल. अर्जदाराकडे मोबाईल क्रमांकही असावा. ज्या बँकेत तुम्हाला अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करायचा आहे, त्या बँकेत हा मोबाईल क्रमांक नोंदणी करावा लागतो.
अटल पेन्शन योजनेच्या दस्तऐवजांमध्ये बँक आणि बचत खात्याचे तपशील, रीतसर भरलेला APY नोंदणी फॉर्म, आधार/मोबाईल क्रमांक तसेच बचत खात्यातील शिल्लक तपशील यांचा समावेश होतो. अटल पेन्शन योजनेअंतर्गत 1,000 ते 5,000 रुपये पेन्शन दिली जाते. ही योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) द्वारे चालविली जाते. मात्र यासाठी गुंतवणूकदाराला बँकेत APY खाते उघडावे लागते. पैसे बँकेत जमा होतील आणि नंतर लाभार्थ्याला पेन्शन मिळेल. ऑटो डेबिट आधारावर खात्यात आपोआप पैसा जमा होतील. एकदा APY फॉर्म नोंदणीकृत झाल्यानंतर दरमहा तुम्ही निर्धारीत केलेली रक्कम निवृत्ती खात्यात जमा होत राहिल.