ग्राहक न्यायालयाचा मोठा निर्णय, ट्रेनमध्ये सामान चोरीला गेल्यास रेल्वे जबाबदार, द्यावी लागेल भरपाई

| Updated on: Apr 10, 2023 | 3:29 PM

ग्राहक आयोगाने म्हटले आहे की रेल्वे प्रवासी आणि त्यांच्या सामानाची सुरक्षा ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे.

ग्राहक न्यायालयाचा मोठा निर्णय, ट्रेनमध्ये सामान चोरीला गेल्यास रेल्वे जबाबदार, द्यावी लागेल भरपाई
RAILWAY
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली :  रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय चंदीगड राज्य ग्राहक आयोगाने दिला आहे. जर तुम्ही आरक्षित डब्यातून प्रवास करीत असाल आणि तुमचे सामान चोरीला गेले तर चोरीला गेलेल्या वस्तूची भरपाई रेल्वेला करावी लागेल असा निकाल ग्राहक आयोगाने दिला आहे. ट्रेनमध्ये झालेल्या पर्स स्नॅचिंगच्या घटनेला रेल्वेला जबाबदार ठरवित प्रवाशाला हरविलेल्या वस्तूच्या किंमती इतका मोबदला देण्याचे आदेश ग्राहक आयोगाने दिले आहेत. तसेच प्रवाशाला झालेल्या मन:स्तापाबद्दल 50 हजार रूपयांची नुकसान भरपाई द्यावी असेही आयोगाने म्हटले आहे.

चंदीगड येथील सेक्टर – 28 मध्ये राहणाऱ्या रामबीर यांच्या तक्रारीवर ग्राहक न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. रामबीर आणि त्यांची पत्नी रेल्वेने प्रवास करीत असताना त्यांच्या पत्नीची पर्स चोरट्याने लांबीवली होती. त्या पर्समध्ये मौल्यवान ऐवज आणि सामान होते. रामबीर आपल्या कुटुंबियांसोबत चंदीगडहून दिल्ली जात होते. रामबीर यांनी जिल्हा ग्राहक न्यायालयात रेल्वे विरोधात दावा दाखल केला. तेथे त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. मग त्यांनी या निर्णयाविरोधा राज्य ग्राहक आयोगाकडे दाद मागितली.

आरक्षित डब्यात फिरत होते संशयित

रामबीर यांनी गोवा संपर्क क्रांती ट्रेनचे तिकीट ऑनलाईन बुक केले होते. 5 नोव्हेंबर 2018 रोजी ट्रेन जेव्हा चंदीगडला रवाना होत होती, त्यावेळी आरक्षित कोचमध्ये संशयित लोक फिरत होते. त्यांनी यासंदर्भात तिकीट तपासनीसांना कल्पना दिली. परंतू त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. अंबाला स्टेशन येताच त्यांच्या पत्नीची पर्स खेचून चोरटे चालत्या ट्रेनमधून उडी मारून पळाले.

1.08 लाख रूपये रेल्वेला द्यावे लागणार

राज्य ग्राहक आयोगाने रेल्वेला दोषी ठरवित ट्रेनमध्ये प्रवासी आणि त्यांच्या सामानाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असल्याचे म्हटले. आयोगाने त्याची चोरीला गेलेल्या पर्सचे 1.08 लाख रूपये आणि झालेल्या मन:स्तापासाठी 50 हजार रूपये देण्याचे आदेश दिले. यापूर्वी अनेक वेळा प्रवाशाचे सामान चोरी झाल्याच्या प्रकरणात रेल्वेला जबाबदार ठरविण्यात आले आहे.