नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांकरीता (Railway Passengers) खूशखबर आहे. आता त्यांना रेल्वे तिकिट न खरेदी करता ही पर्यटन करता येईल. हो, अगदी खरं आहे. ही ऑफर (Offer) इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) आणली आहे. तुम्ही फिरून आल्यावर अगदी निवांत तिकिटाची रक्कम अदा करु शकता. तर काय आहे ही ऑफर पाहुयात..
रेल्वे यात्रेकरुंसाठी IRCTC ने ही अनोखी ऑफर आणली आहे. त्यासाठी तुम्हाला रेल्वे कनेक्ट मोबाईल अॅपचा वापर करता येईल. तसेच ट्रॅव्हल नाऊ पे लॅटर (TNPL) या सुविधेचा लाभ घेता येईल. IRCTC ने फायनानेंशियल प्लॅटफॉर्म CASHe सोबत यासाठी करार केला आहे.
CASHe नुसार, रेल्वे प्रवाशी, ट्रॅव्हल नाऊ, पे लॅटर या सुविधेचा वापर करुन सामान्य तिकिटांशिवाय तात्काळ तिकीटही बूक करु शकतात. त्यासाठी त्यांना या प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल.
CASHe ने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना IRCTC च्या रेल कनेक्ट या अॅपचा वापर करावा लागेल. त्याठिकाणी TNPL पेमेंटचा पर्याय निवडता येईल. त्याआधारे, रिझर्व्ह तिकिट बुकींग करता येईल.
एकदा हा पर्याय निवडल्यावर प्रवाशाला आरक्षित अथवा तात्काळ तिकिट बुकींचा पर्याय खुला होईल. त्यानंतर प्रवाशाला चेकऑऊट पेजवर किती हप्त्यात ही रक्कम चुकती करायची आहे, त्याची निवड करावी लागणार आहे.
ही संपूर्ण प्रक्रिया कोणत्याही कागदपत्राविना सहजसोप्या पद्धतीने रेल्वेच्या प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. TNPL च्या माध्यमातून खरेदी केलेल्या रेल्वे तिकिटांची किंमतीची परतफेड प्रवाशांना हप्त्यांमध्ये करता येईल.
तिकिट दरांची परतफेड करण्यासाठी प्रवाशांना काही कालावधी देण्यात येणार आहे. त्यानुसार, प्रवाशांना 3 ते 6 महिन्यात ही रक्कम अदा करावी लागेल. या नवीन सुविधेमुळे रेल्वे प्रवाशांना रेल्वे तिकिटासाठी तात्काळ रक्कम जमा करण्याची आवश्यकता राहणार नाही.