नवी दिल्ली : सध्या एकच गोष्ट सुसाट आहे, ती म्हणजे महागाई. महागाईने (Inflation) सर्वसामान्य हैराण आहेत. त्यामुळे नागरिकांची बचत कमी होत आहे. दैनंदिन जीवनातील अनेक आवश्यक वस्तू महागल्याने खर्च वाढला आहे. या महागाईमुळे सर्वात जास्त फटका मध्यमवर्गाला बसला. पैसाच हातात उरत नसल्याने त्यांच्या श्रीमंत होण्याच्या स्वप्नांना सुरुंग लागला आहे. पण कमी पगारात पण तुम्हाला करोडपती (Crorepati) होता येईल. त्यासाठी एक खास फॉर्म्युला आहे. कमी पगारात पण तुम्हाला श्रीमंत होता येईल. पण त्यासाठी हवं खास नियोजन आणि आर्थिक शिस्त.
हा फॉर्म्युला येईल कामी
श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला 50:30:20 हा फॉर्म्युला कामी येईल. हा फॉर्म्युला तुमची कमाई तीन भागात वाटणी करतो. त्यात तुमच्या गरजा, इच्छा आणि बचत यांचा समावेश आहे. या नियमानुसार, तुमच्या कमाईचा 50 टक्के वाटा भाडे, किराणा, वाहतूक आणि इतर किरकोळ गरजा पूर्ण करण्यावर खर्च होतो. तर 30 टक्के रक्कम ही हॉटेलिंग, मनोरंजन, खरेदी यावर खर्चासाठी राखीव ठेवा. तर 20 टक्के रक्कम ही भविष्यातील आर्थिक लक्ष गाठण्यासाठी हाताशी ठेवा. ही रक्कम तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरता येईल.
तर होईल आर्थिक प्रगती
50:30:20 हा नियम तुम्ही कसोशिने पाळला तर तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमची बचत वाढेल. ही बचत तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून गुंतवू शकता. त्यामुळे चांगल्या योजनेत तुम्हाला अल्पबचतीच्या माध्यमातून मोठा निधी उभारता येईल. चक्रव्याढ व्याजाच्या मदतीने तुम्हाला लॉन्ग टर्म रिटर्न मिळतील. म्युच्युअल फंडातील एसआयपीच्या माध्यमातून मोठा निधी उभारता येतो.
30 हजारात कसा होईल फायदा
समजा तुमचा पगार 30 हजार रुपये आहे. तर 50:30:20 हा नियम तुमच्या उपयोगी पडू शकतो. त्यासाठी पगार 50:30:20 या प्रमाणात वाटप करावा लागेल. पगाराचे तीन हिस्से करावे लागतील. तुमच्या पगाराचे या आधारे
15,000, 9,000 आणि 6,000 अशी विभागणी होईल.
पहिला वाटा असा वापरा
पगारातील 50 टक्के वाटा तुम्ही तुमच्या आवश्यक कामासाठी खर्च करा. यामध्ये किराणा, जेवण, भाडे, शिक्षा वा इतर खर्च करता येईल. खर्चाची भीती वाटत असेल तर ही रक्कम अगोदरच तुम्ही दुसऱ्या खात्यात हस्तांतरीत करा. त्यामुळे 15,000 रुपये तुम्ही याच गरजांसाठी खर्च करु शकाल.
दुसरा हिस्सा
या फॉर्म्युलाप्रमाणे दुसरा हिस्सा तुम्ही बाहेर फिरण्यासाठी, सिनेमा, हॉटेलिंग वा इतर छंदासाठी वापरु शकता. पण महागाई पाहता उधळपट्टी करणे तुम्हाला फायद्याचं ठरणार नाही. 9,000 रुपये तुम्ही या कामासाठी राखून ठेवू शकता.
करोडपती करणारा हिस्सा
आता सर्वात महत्वाचा तिसरा हिस्सा, जो तुम्हाला करोडपती बनवू शकतो. 30,000 रुपयांमध्ये 6,000 रुपयांची ही बचत तुम्हाला श्रीमंत करु शकते. ही रक्कम तुम्हाला गुंतवणुकीसाठीच वापरावी लागेल. योग्य ठिकाणी बचत केल्यास तुम्हाला मोठा फायदा होईल. हे 6000 रुपये तुम्हाला मालामाल केल्याशिवाय राहणार नाहीत.
काय आहे फॉर्म्युला
तुम्ही दर महा योग्य म्युच्युअल फंडमध्ये 6000 रुपये एसआयपीद्वारे गुंतवल्यास मोठा फायदा होईल. दरवर्षी थोडाफार पगार वाढल्यास या वाढीव पगारातील काही हिस्सा पुन्हा एसआयपीत गुंतवल्यास तुम्हाला फायदा होईल. दरवर्षी एसआयपीत तुम्ही 20 टक्के वाढ केली. 20 वर्षांपर्यंत गुंतवणूक केली, तर फायदा दिसेल. 12 टक्के हिशोबाने तुम्हाला एकूण 2,17,45,302 रुपये मिळतील. तर व्याजाच्या रुपाने 15 टक्के परतावा मिळाल्यास ही रक्कम 3,42,68,292 रुपये होईल. म्हणजे 20 वर्षांनंतर तुम्ही करोडपती होऊ शकता.