सुभाष यांनी नवीन कार खरेदी केली आणि कार डीलरकडून (Car dealer) विमा पॉलिसीही (Insurance policy) घेतली. काही महिन्यांनंतर एका किरकोळ अपघातात त्यांच्या कारचं नुकसान झालं. अपघातामुळे इंजिनमधून (Engine) तेल गळू लागलं. त्यांनी विमा योजना घेतल्याने इतर प्रकारच्या नुकसानीची दुरुस्ती कव्हर केली गेली. मात्र इंजिनचे झालेले नुकसान भरून निघाले नाही. कार विम्यामध्ये अशा नुकसानीचा खर्च भरून निघत नाही, असं विमा कंपनीनं सुभाषला सांगितले. त्यानंतर इंजिनच्या दुरुस्तीचा खर्च सुभाषला स्वत: करावा लागला. वाहनाच्या अशा अनेक बाबी असतात, ज्याचे झालेले नुकसान कोणतीही विमा कंपनी कव्हर करत नाही. कार विम्यामध्ये टायर, इंजिन आणि यांत्रिक किंवा इलेक्ट्रिकल बिघाडामुळे होणारे नुकसान भरून येत नाही. यात कारचे तुटणे, ब्रेकेज किंवा कारचे मूल्य कमी होणे, ठराविक कालावधीत तुमच्या कारचा घसारा म्हणजेच डेप्रीसिएशन होणे इत्यादी गोष्टींचा देखील समावेश होत नाही. तुम्ही यापैकी काही बाबींसाठी अॅड ऑन कव्हर घेऊ शकता.
कार विमा डेप्रीसिएशनचा खर्च कव्हर करत नाही. तुम्ही कार खरेदी करताच तिची किंमत कमी होत असते. वाहनाच्या मूल्याचे हे डेप्रीसिएशन विमा कंपनी कव्हर करत नाही. क्लेम सेटलमेन्टच्या वेळी तुमच्या कार आणि तिच्या पार्ट्सची किंमत जेवढी कमी झाली असेल तेवढी रक्कम भरपाईमधून वजा करण्यात येते. हे टाळण्यासाठी, तुम्ही अॅड ऑन म्हणून शून्य डेप्रीसिएशन कव्हर घेऊ शकता. सर्वसमावेशक वाहन विमा पॉलिसी अंतर्गत इंजिन आणि टायर संरक्षण समाविष्ट नाही. टायर्समुळे होणारी झीज हे वाहनाला ठराविक कालावधीत झालेले नुकसान म्हणून गणलं जातं. इंजिनमध्ये तेल गळती किंवा ओलावा वाढणं देखील पॉलिसीमध्ये समाविष्ट नाही. या समस्यांसाठी देखील तुम्हाला अॅड ऑन कव्हर घेता येते. तुमच्याकडे अॅड ऑन कव्हर असेल तर संबंधित कंपनीकडे तुम्ही नुकसान भरपाईचा दावा करू शकता.
अपघातात कारमध्ये अनेक प्रवासी असू शकतात. कोणतीही मोठी दुर्घटना घडल्यास गाडीच्या नुकसानाबरोबरच गाडी चालवणारी व्यक्ती आणि वाहनातील इतर प्रवासीही जखमी होऊ शकतात. दुर्दैवाने, कार विमा पॉलिसीमध्ये कारमधील इतर प्रवाशांना वैयक्तिक अपघात कव्हर मिळत नाही. यासाठी तुम्ही पॅसेंजर कव्हर अॅड ऑन कव्हर म्हणून घेऊ शकता.कार विम्यामध्ये सहसा तुम्ही कारच्या देखभालीसाठी वापरत असलेल्या गोष्टींची किंमत कव्हर करत नाही. उदाहरणार्थ, वंगण, वॉशर, इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल, स्क्रू-बोल्ट इत्यादी. अशा वस्तूंवर होणारा खर्च वाहन मालकाला करावा लागतो. तसेच हा खर्च टाळण्यासाठी पाच वर्षांपेक्षा कमी जुन्या कारसाठी इतर वस्तूंचे अॅड ऑन कव्हर घेतले जाऊ शकते. कारची चावी हरवली असेल तर बदलण्याची किंमत विमा पॉलिसी अंतर्गत समाविष्ट केली जाणार नाही. तसेच यासाठी वेगळे ‘की रिप्लेसमेंट’ कव्हर खरेदी करू शकता आणि खर्चात बचत करू शकता. थोडक्यात काय तर कार विमा खरेदी करताना, काय समाविष्ट आहे आणि काय समाविष्ट नाही ते तपासा. महत्त्वाच्या वाटणाऱ्या अशा वस्तूंसाठी तुम्ही अॅड ऑन कव्हर घ्या.