नवी दिल्ली : सध्या देशातील सर्वात प्रीमियम ट्रेन ‘वंदे भारत’ (Vande Bharat Train) आहे. वेगवान आणि आरामदायी प्रवासासाठी भारत सरकारने ही रेल्वे सुरु केली आहे. अनेक राज्यांनी ही रेल्वे सुरु करण्याची मागणी केली आहे. देशभरात वंदे भारतचे जाळे वाढत आहे. कमी काळात गंतव्य स्थानी पोहचता येत असल्याने या ट्रेनची मागणी वाढली आहे. काही दिवसांतच स्लीपर वंदे भारत ट्रेन सुद्धा सुरु करण्यात येत आहे. वंदे भारत ट्रेनचा प्रवास आणखी स्वस्त होणार आहे. वंदे भारत ट्रेनचे तिकीट (Train Fare) कमी करण्यात येणार आहे. पण हा निर्णय का घेण्यात आला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे, त्यामागची ही कारणं आहेत.
कारण काय
एजन्सीच्या वृत्तानुसार, वंदे भारत ट्रेनच्या प्रवाशांची संख्या रोडावल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. जून महिन्यात भोपाळ-इंदुर या मार्गावरील वंदे भारतमध्ये केवळ 29 टक्के प्रवाशी होते. इंदुर-भोपाळ या प्रवासादरम्यान केवळ 21 टक्के प्रवाशांनी बुकिंग केले होते. या दोन शहरातील अंतर कापण्यासाठी 3 तासांचा वेळ वाचतो. पण एसी चेअरचे भाडे 950 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअरचे भाडे 1525 रुपये आहे. त्यामुळे अनेक जण वंदे भारतचा प्रवास करत नसल्याचे समोर आले आहे. परिणामी वंदे भारत ट्रेनच्या भाड्यात कपातीची शक्यता आहे. किती भाडे कमी करण्यात येईल, याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
भाडे कमी केल्याने प्रवाशी वाढतील
वंदे भारत ट्रेनचे सध्याचा सर्वात लांबचा प्रवास 10 तासांचा तर सर्वात कमी प्रवास अवघ्या 3 तासांचा आहे. भाडेवाढीमुळे अनेक वंदे भारतमधील सीट रिकाम्या राहत असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे भाडे पत्रकाचा आढावा घेण्यात येत आहे. वंदे भारत हा भारत सरकारचा विशेष उपक्रम आहे. अधिक सुविधा देऊन प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आता भाडे कपातीचा निर्णय घेण्यात येणार आहे. कमी अंतराच्या वंदे भारताचे भाडे कमी केल्यास जास्तीत जास्त प्रवाशी येतील, असा अंदाज लावण्यात येत आहे.
प्रवाशांना अधिक सुविधा
वंदे भारतच्या स्लीपर क्लास कोचमध्ये प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळतील. या ट्रेनमध्ये वाय-फायची सुविधा मिळेल. एलडी स्क्रीन प्रवाशांना स्थानकासह इतर माहितीची अपडेट देत राहील. सुरक्षा, आरामदायक प्रवास यासाठी या ट्रेनमध्ये अनेक सुविधा असतील. या रेल्वेत ऑटोमॅटिक फायर सेंसर, GPS सिस्टम तसेच बेडही अत्यंत आरामदायक असतील. ही ट्रेन पूर्णपणे इकोफ्रेंडली असेल.
एकाच वेळी 5 वंदे भारत ट्रेन
भारतीय रेल्वे एकाचवेळी 5 वंदे भारत ट्रेन सुरु करत आहे. हा कार्यक्रम येत्या 26 जून रोजी होत आहे. वंदे भारत आता मुंबई-गोवा, बंगळुरु-हुबळी-धारवाड, पाटणा-रांची, भोपाळ-इंदुर आणि भोपाळ-जबलपूर या मार्गावर धावेल. ऑगस्ट 2024 पर्यंत 75 वंदे भारत ट्रेन धावणार आहेत.