मुंबई : एप्रिलपासून तुमच्या वाहनांसाठी जास्त विमा प्रीमियम (Insurance Premium) भरावा लागणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं (Union Ministry of Road Transport) वाहनांच्या विविध श्रेणींसाठी थर्ड पार्टी विमा प्रीमियममध्ये (Third Party Insurance) वाढ करण्याचा प्रस्ताव दिलाय. विम्याचे नवे दर हे पुढील आर्थिक वर्षापासून लागू होणार आहेत. म्हणजेच 1 एप्रिलपासून कार आणि दुचाकी वाहनांच्या विम्याच्या दरात वाढ होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षे विम्याच्या प्रीमियममध्ये कुठलिही वाढ करण्यात आली नव्हती. मात्र, आता 1 एप्रिलपासून ही वाढ लागू होणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाच्या सुधारित प्रस्तावानुसार 1 हजार सीसी इंजिन क्षमता असणाऱ्या खासगी वाहनांसाठी 2019-20 मधीलहजार 72 रुपयांच्या तुलनेत 2022 मध्ये 2 हजार 94 रुपये दर लागू असेल. यानुसार 1 हजारसीसी ते दीड हजार सीसी इंजिन क्षमता असलेल्या कारसाठी 3 हजार 221 च्या तुलनेत 3 हजार 416 रुपये दर लागू असेल. तर दीड हजार सीसी पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या वाहनांसाठी 7 हजार 890 रुपयांच्या तुलनेत 7 हजार 897 रुपये प्रीमियम दर लागू होईल. दुचाकी वाहनांसाठी दीडशे सीसी ते साडे तीनशे सीसी इंजिन क्षमता असलेल्या वाहनांसाठी 1 हजार 366 रुपये प्रीमियम दर असेल. तर साडे तीनशे पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या वाहनांसाठी 2 हजार 84 रुपयांचा प्रीमियम लागू असेल. दरम्यान, 2019-20 च्या प्रस्तावानुसार इलेक्ट्रिक खासगी वाहन, इलेक्ट्रिक दुचाकी आणि हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनांना प्रीमियमधून सूट कायम राहील. ही सूट पर्यावरण पूरक वाहनांच्या वापरासाठी प्रोत्साहन देईल, असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने म्हटलंय.
थर्ड पार्टी विमा हा लायबिलीटी कव्हरच्या नावानेही ओळखलं जातं. वाहनांच्या अपघातात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचं नुकसान होऊ शकतं. थर्ड पार्टी विमा हा तिसऱ्या व्यक्तीसाठी संबंधित असतो. एखाद्या वाहनाच्या अपघातात तर कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचं नुकसान झालं तर विमा कंपनी वाहनाच्या अपघातासाठी त्या तिसऱ्या व्यक्तीला क्लेम देते. आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी थर्ड पार्टी इन्श्यूरन्स अनिवार्य करण्यात आलाय. त्याचा प्रीमियम भरून वाहन मालक या विम्याचा लाभ घेऊ शकतात.
इतर बातम्या :