नवी दिल्ली | 22 डिसेंबर 2023 : जर तुम्ही 18 वर्षांचे असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. या वयात अनेक जण आधार कार्ड तयार करतात. आतापर्यंत आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया सोपी होती. आधार केंद्रावर जाऊन, बायोमॅट्रिक पद्धतीचे पालन केले की आधार कार्ड घरपोच मिळत होते. पण आता नियमात बदल करण्यात आला आहे. आधार कार्डविषयीची अपडेट समोर आली आहे. नवीन नियमानुसार, पहिल्यांदा आधार कार्ड तयार करायचे असेल तर नागरिकाला पासपोर्ट विषयी जशी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागते, तशी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. काय आहे हा बदल, जाणून घ्या…
नियमात लवकरच बदल
मीडिया रिपोर्टनुसार, एका अधिकाऱ्याने या बदलाविषयी माहिती दिली आहे. पासपोर्ट काढण्यासाठी व्हेरिफिकेशन करावे लागते. आता आधार कार्डसाठी पण हीच प्रक्रिया लागू करण्यात येणार आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) नाही तर राज्य सरकार त्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करणार आहे. राज्य सरकार त्यासाठी जिल्हा प्रशासनातील अथवा उपविभागीय अधिकाऱ्याला नोडल अधिकारी म्हणून अथवा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी नामनिर्देशित केले जाऊ शकतात.
काय असेल प्रक्रिया
पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन पडताळा प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्याच धरतीवर आधार कार्डसाठी व्हेरिफिकेशन करावे लागेल. 18 वर्ष अथवा त्यापुढील वयाच्या व्यक्तीला पहिल्यांदा आधारा कार्ड काढण्यासाठी या प्रक्रियेला सामोरे जावे लागेल. त्यासाठी मुख्य टपाल कार्यालय अथवा युआयडीएआयने नामनिर्देशित केलेल्या आधार केंद्रावर जावे लागेल. आधार कार्डसंबंधीची सर्व प्रक्रिया पूर्ण करतानाचा पडताळणी दाखला सर्वात महत्वाचा राहिल.
कधी मिळेल आधार
सेवा पोर्टलच्या माध्यमातून सर्व पडताळा झाल्यानंतर खात्री पटल्यानंतर आधार कार्डला हिरवा कंदिल देण्यात येईल. पुढे180 दिवसांत आधार कार्ड घरपोच येईल. या मार्गदर्शक सूचनांची देशभरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. एकदा आधार कार्ड घरपोच आल्यानंतर त्यात अपेडट करण्यासाठी नेहमीचीच प्रक्रिया असेल. पण पहिल्यांदा आधार कार्ड काढण्यासाठी आता व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे.