नवी दिल्ली : देशात महागाईचा (Inflation) भडका उडाला असतानाच आता महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे. आज राज्यासह देशभरात सीएनजीच्या दरामध्ये (CNG rate) वाढ झाली आहे. एकीकडे गेल्या 45 दिवसांपासून पेट्रोल (Petrol), डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र दुसरीकडे आज सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सीएनजी, पीएनजी आणि एलपीजी गॅसच्या दरात वाढ सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. आज राजधानी दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरात किलो मागे दोन रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्लीत सीएनजीचे दर प्रति किलो 75.61 रुपयांवर पोहोचले आहेत. नवी दरवाढ आजपासून लागू करण्यात आली आहे. पेट्रोल, डिझेल महाग झाल्याने सीएनजी इंधनावर चाणाऱ्या वाहनांमध्ये देशभरात वाढ होत आहे. मात्र आता सीएनीज देखील महागल्याने याचा मोठा फटका हा वाहतूक व्यवसायिकांना बसत आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च देखील महाग झाला आहे. वाहतूक खर्च वाढल्याने जवळपास सर्वच वस्तू या महाग झाल्या आहेत.
आज राज्यासह देशभरात सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे दोन रुपयांची वाढ झाली असून, दिल्लीत आता सीएनजीचे दर प्रति किलो 75.61 रुपयांवर पोहोचले आहेत. नोएडामध्ये सध्या सीएनजीचे दर प्रति किलो 78.17 रुपये एवढे आहेत. गाझियाबादमध्ये सीएनजीचा दर प्रति किलो 78.17 रुपये एवढा आहे. मुझफ्फरनगरमध्ये सीएनजीचा दर प्रति किलो 82.84 रुपये एवढा आहे. तर गुरुग्राममध्ये सीएनजीचा दर प्रति किलो 83.94 रुपयांवर पोहोचला आहे. राज्यात आज पुणे आणि नाशिकमध्ये सीएनजीचे दर वाढले आहेत.
राज्यात आज पुण्यामध्ये पुन्हा एकदा सीएनजी महाग झाला आहे, पुण्यात आज सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे दोन रुपये सत्तर पैशांची वाढ झाली आहे. नव्या दरानुसार आता पुण्यात सीएनजीचा भाव प्रति किलो 80 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या दीड महिन्यातील ही चौथी दरवाढ आहे. दीड महिन्यापूर्वी पुण्यात सीएनजीचे दर प्रति किलो 68 रुपये एवढे होते. त्यामध्ये पाच रुपयांची वाढ करण्यात आल्याने दर 73 रुपयांवर पोहोचले तेव्हापासून दरात सातत्याने वाढ सुरूच आहे.
दरम्यान आज नाशिकमध्ये देखील सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. नाशिकमध्ये आज सीएनजी तीन रुपयांनी महागला आहे. नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आता नाशिकमध्ये सीएनजीचे दर प्रति किलो 86 रुपयांवर पोहोचले आहेत. दरम्यान येणाऱ्या काळात सीएनजीच्या दरात आणखी वाढ होण्याचे संकेत मिळत आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या दारत देखील मोठी भाववाढ पहायला मिळत आहे.