महागाईच्या झळांनी (Inflation) सर्वसामान्य जनता पोळून निघत आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस यांच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. त्यात आता आणखी भर पडण्याची चिन्हे दिसत आहे. यंदा डाळ आणि भाताच्या (धान) (Rice) लागवडीत मोठी घट झाली असून, त्यामुळे लवकरच डाळ व तांदूळाच्या दरात वाढ होण्याती शक्यता आहे. याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे. यापूर्वी जीएसटी परिषदेने (GST Council) खाद्यांन्न व अन्नधान्य जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतल्याने पॅकबंद दही, लस्सी, ताक, खाण्याचे पदार्थ, अन्नधान्य इत्यादी गोष्टींचे दर वाढले आहेत. त्यातच आता डाळ – तांदूळही महागले, तर सर्वसामान्य जनतेने खायचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कृषी मंत्र्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 15 जुलैपर्यंत धानची (भात) लागवड 17.4 टक्क्यांनी कमी झाली. आत्तापर्यंत केवळ डाळ- तांदूळाचेच भाव स्थिर होते. मात्र लवकरच ही परिस्थिती बदलणार असून त्यांच्याही दरात वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. सार्वकालिक उच्चांकावरून 52 टक्के इतकी घसरण झालेल्या तूर डाळीच्या दरात 2022 सालात आत्तापर्यंत 6.5 टक्के तेजी आली आहे.
दरम्यान 2021-2022 या वर्षात धानाची सरकारी खरेदी घटल्याचे दिसून आले आहे. या वर्षातील रबी हंगामात 44 लाख टन धान खरेदी झाली आहे. 2020-2021 साली हा आकडा 66 लाख होता. तर त्यापूर्वी म्हणजेच 2019-2020 साली 80 लाख टन धान खरेदी झाली होती. 2020-2021 साली एकूण धान खरेदीचा आकडा 135 लाख टन इतका होता. मात्र यंदा (2021-2022 वर्षात) धान खरेदीत हा आकडा गाठला जाईल, याची शक्यता कमी दिसत आहे.
दरम्यान पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार व मध्य प्रदेश या राज्यांमधील धानाच्या लागवडीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 31 टक्के घट झाल्याचे दिसून आले. तसेच तूर डाळीच्या लागवडीतही आत्तापर्यंत 26 टक्के घट झाल्याचे नोंदवण्यात आले आहे.