नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (Employees Provident Fund Organization) सर्व्हरने गेल्या काही दिवसात मोठा घोळ घातला होता. देशभरातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यात किती रक्कम जमा आहे, ते कळत नव्हते. सर्व्हर डाऊन झाल्याने हा घोळ झाला होता. आता कित्येक दिवसांपासून कर्मचारी व्याजाची प्रतिक्षा करत आहेत. ईपीएफओच्या पासबुकमध्ये (EPFO Passbook) यासंबंधीची अपडेट प्राप्त होते. तसेच खात्यातून रक्कम काढली तरी खात्यात त्यासंबंधीची माहिती अपडेट होते. भारताच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयातंर्गत (Ministry of Labour and Employment) ईपीएफओ कार्यरत आहे. या खात्यातून कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यातील जमा रक्कम, निवृत्ती वेतन आणि विमा योजनेची माहिती मिळते.
EPFO पासबुक कसे चेक करणार?
पीएफ खात्यात केंद्र सरकार जशी व्याजाची रक्कम जमा करते, तेव्हाच ईपीएफ पासबुकमध्ये ही माहिती अपडेट होते. पासबुक कर्मचाऱ्यांना ईपीएफओच्या संकेतस्थळावर आणि मोबाईल एपवर तपासता येते. पासबुक बघण्यासाठी कर्मचाऱ्याकडे त्याचा युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (Universal Account Number) आणि पासवर्ड (EPFO Password) यांची गरज असते. याचा वापर करुन पासबुक बघता येते.
व्याजाचा तपशील नसेल तर काय होईल नुकसान?
अनेक कर्मचाऱ्यांना त्यांचे पासबुक अपडेट नसल्याने नुकसान होईल अशी भीती सतावत आहे. यासंबंधी ईपीएफओने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरुन माहिती दिली आहे. त्यानुसार, पासबुकमध्ये व्याज अपडेट करणे ही एक एंट्री प्रोसेस आहे. पासबुकमध्ये व्याज कोणत्याही तारखेला अपडेट झाले तरी त्याचा आर्थिक हितसंबंधावर कोणताही परिणाम होत नाही. आर्थिक वर्ष संपल्यानंतर केंद्र सरकार व्याजाची रक्कम जमा करते. तसेच व्याजदर लागू करण्यात उशीर झाला तरी, घोषणेच्या दिवसापासूनच ते गृहीत धरण्यात येते. त्याचा हिशोब तेव्हापासून मोजण्यात येतो. त्यामुळे सदस्यांचे कोणतेही नुकसान होत नाही. त्यामुळे पासबुक अपडेट झाले नाही तरी काळजी करु नका.
अशी काढता येते रक्कम
एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसदार EPF मधील रक्कम काढू शकतो. पण जर नामनिर्दशीत व्यक्ती अथवा वारसदारांची नोंदणी झाली नसल्यास मग काय करता येईल? ही रक्कम बुडीत खात्यात जमा होते का? तर नाही. ही रक्कम कर्मचाऱ्याच्या वारसांना मिळते. त्यासाठी काही कागदी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. कधी कधी न्यायालयातून त्यासाठीचा हुकूमनामा आणवा लागतो.