नवी दिल्ली : जून महिन्याच्या सुरुवातीलाच देशात इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) दाखल करण्याचा हंगाम सुरु होतो. आयटीआर फाईल (ITR Filing) हे एक तांत्रिक काम आहे. आयटीआर भरताना एक चूक तुम्हाला ताप देणारी ठरते. प्राप्तिकर खाते या चुकीमुळे तुम्हाला आयटीआर नोटीस (IT Notice) पाठवू शकते. जर तुम्ही नोकरदार असाल तर आर्थिक वर्ष 2022-23 आणि मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी प्राप्तिकर रिटर्न दाखल करु शकता. पण त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आयटीआर फाईल करणे सोपे होईल आणि नंतर कुठल्याही प्रकारचा ताप होणार नाही.
आयटीआर फाईल करण्यापूर्वी याची करा उजळणी
आयटीआर फाईल करण्यापूर्वी काही गोष्टींची उजळणी करणे आवश्यक आहे. यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक यांचा तपशील द्या. आयकर विभागाच्या अधिकृत संकेस्थळावर https://eportal.incometax.gov.in ला भेट द्या. याठिकाणी आयटीआर फाईल करण्यासाठी तुमचा युझर आयडी आणि पासवर्ड तयार करा. एक गोष्ट लक्षात ठेवा पॅन कार्ड क्रमांक युझर आयडी असेल आणि पासवर्ड तुम्ही निश्चित कराल तो असेल.
पासवर्ड विसरला तर
अनेकदा करदाते युझर आयडी आणि पासवर्ड क्रिएट करतात. पण ते पासवर्ड विसरुन जातात. अशावेळी चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही Forget पासवर्ड हा पर्याय निवडू शकता. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठविण्यात येईल. हा क्रमांक नोंदवावा लागेल. तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्नित असणे, लिंक असणे आवश्यक आहे. तसेच पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक असणे पण आवश्य आहे. त्यानंतर तुम्हाला नव्याने पासवर्ड क्रिएट करता येईल.
AIS तपासून पाहा
आयटीआर फाईल करण्यापूर्वी करदात्यांनी AIS म्हणजे (Annual Information Statement) वार्षिक विवरण पत्र तपासून घ्यावे. एआयएसमध्ये कमाईची सर्व माहिती विस्तृतपणे देण्यात येते. यामधील पहिल्या भागात तुमचे नाव, पत्ता, पॅन कार्ड, आधार कार्ड अशी माहिती द्यावी. दुसऱ्या भागात तुम्हाला कमाई, मिळकत, उत्पन्नाचा स्त्रोत, टीडीएस, आगाऊ कर, सेल्फ असेसमेंट, डिमांड अशी माहिती तपशीलवार भरावी लागेल. त्यानंतर प्राप्तिकर रिटर्न जमा करता येईल. यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही.
अंतिम मुदत काय
प्राप्तिकर विभागाने 25 एप्रिल 2023 रोजी आयटीआर फॉर्म 1 आणि 4 साठी ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध करुन दिले आहे. तुम्ही संकेतस्थळावरुन ते डाऊनलोड करुन घेऊ शकता. आर्थिक वर्ष 2022-23 साठी ज्या करदात्यांच्या खात्याचे ऑडिट करण्याची गरज नाही, त्यांच्यासाठी आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. त्यानंतर फॉर्म भरल्यास दंड भरावा लागेल.
कोणासाठी कोणता फॉर्म
आयटीआर फॉर्म 1 हा नोकरदार,ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिक आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी आहे. तर आयटीआर फॉर्म 4 हा कंपन्या आणि व्यावसायिकांसाठी आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही, त्यांच्यासाठी हा अर्ज आहे.