नवी दिल्ली | 1 डिसेंबर 2023 : भरपूर पैसा कमविणे सोपे काम नाही. बँकेत बचत केली तरी एक ठराविक मर्यादीत रक्कम जमा होते. तुम्ही कधी विचार केला का की लखपती, कोट्याधीश होण्यासाठी किती कालावधी लागेल? अर्थात तुम्ही किती रक्कम दरमहा गुंतवतात त्यावर हे अवलंबून असेल. एवढेच नाही तर त्या गुंतवणूकीवर किती परतावा मिळतो. त्यावर पण ही रक्कम किती वाढते हे अवलंबून असते. पण एक कोटी रुपये जमा करण्यास वेळ लागेल पण ही एकदमच अवघड गोष्ट नाही. आर्थिक शिस्त आणि कंपाऊंडिंगच्या शक्तीने दीर्घकाळातील गुंतवणूक तुम्हाला लखपती, कोट्याधीश करेल. तुमची बचत ही काही वर्षांतच दुप्पट वा तिप्पट होईल.
कंपाऊंडिंग कसे करते श्रीमंत
बँकेतील बचतीवर, आवर्ती ठेव योजना, मुदत ठेव योजनेत एका मर्यादेबाहेर तुम्हाला व्याज मिळत नाही. तुमची मुळ रक्कम दुप्पट होण्यासाठी इथं अधिक काळ लागतो. तसेच त्यावर चक्रव्याढ व्याजाचा मोठा लाभ होताना दिसत नाही. कंपाऊंडिंगमध्ये हाच चमत्कार होतो. व्याजाची रक्कम तुमच्या मुळ रक्कमेत जमा होते आणि त्यावर पुन्हा व्याज मिळते. म्हणजे व्याजावर व्याज मिळते. तुमच्या मुळ रक्कमेवर अधिक परतावा मिळतो.
हा 8-4-3 नियम आहे तरी काय
जर तुम्हाला कमी वेळेत 1 कोटी रुपये जमा करायचे असतील तर तुम्हाला कंपाऊंडिंगचा 8-4-3 हा नियम माहिती असणे आवश्यक आहे. हे एका उदाहरणावरुन समजूयात. जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये SIP च्या माध्यमातून दरमहा 21,250 रुपयांची गुंतवणूक केली. त्यावर दरमहा 12% व्याज मिळाले. वार्षिक चक्रवाढ व्याजाने तुमच्या म्युच्युअल फंड खात्यात आठच वर्षात 33.37 लाख रुपये जमा होतील.
कंमाऊंडिंगचा नियम
ही 8 वर्षांची गुंतवणूक तुम्ही केली. आता पुढील 33 लाख रुपये जमा होण्यासाठी 8 वर्षे लागणार नाहीत तर केवळ 4 वर्षे लागतील. तर त्यापुढील 33.33 लाख रुपये जमा होण्यासाठी केवळ 3 वर्षे लागतील. म्हणजे एकूण 15 वर्षांत 1 कोटी रुपये जमा होतील. आता तुम्हाला वाटत असेल की इथं पगारच कमी आहे. तिथे बचत किती करणार? तर या फॉर्म्युलामध्ये तुमची दोन हजार, तीन हजार, चार हजारांची बचत बसून पाहा. तुम्हाला लखपती होण्यापासून कोणी रोखू शकत नाही.