नवी दिल्ली : सुट्टीच्या दिवशी (Weekly Off) ऑफिसचा कॉल (Call) अथवा एसएमएसही (SMS) नको वाटतो. अनेक कर्मचारी सुट्टीचा दिवस निवांत, कुटुंबासह घालवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना यादिवशी, अथवा सुट्या घेतलेल्या काळात कार्यालयातून कसलाही व्यत्यय नको असतो. एका कंपनीने कर्मचाऱ्यांची ही भावना ओळखलीच नाही तर जपण्याचा प्रयत्न केला आहे. स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म ड्रीम 11 (Dream11) या कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण धोरण आखले आहे. त्यानुसार, कर्मचारी सुट्टीवर असेल तर त्या दिवशी कामासंबंधी त्याला कुठलाही कॉल अथवा एसएमएस करता येणार नाही.
ड्रीम 11 ने याविषयीचा कठोर नियम तयार केला आहे. सुट्टीवरील कर्मचाऱ्याला त्याच्या सहकारी कर्मचाऱ्याने, वरिष्ठाने कामासंबंधी कॉल अथवा एसएमएस केल्यास अशा कर्मचाऱ्याला मोठा आर्थिक दंड भरावा लागणार आहे. कर्मचाऱ्याला त्याची सुट्टी आनंदात घालवता यावी यासाठी कंपनीने हे धोरण स्वीकारले आहे.
ड्रीम 11 कंपनीने त्यासाठी अनप्लग पॉलिसी (Unplug Policy) आणली आहे. या धोरणानुसार, कर्मचारी त्याची सुट्टी कार्यालयीन कामकाजाशीसंबंधीत ई-मेल, संदेश अथवा कॉलविना घालवू शकतील. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. कर्मचारी एका आठवड्याच्या सुट्टीत स्वतःला कोणत्याही कामापासून अलिप्त ठेऊ शकतो.
याविषयीची माहिती कंपनीने लिंक्डइनवर एक पोस्ट करुन दिली आहे. ड्रीम 11 मध्ये आम्ही कर्मचाऱ्यांचे हितरक्षण करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. कंपनी धोरणाची घोषणा करुन थांबली नाही तर याविषयीची कडक अंमलबजावणीही करण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्टसनुसार एखाद्या कर्मचाऱ्याने या नियमाचा भंग केल्यास त्याला एक लाख रुपयांचा दंड होईल.
कंपनीचे संस्थापक हर्ष जैन आणि भावित सेठ यांनी याविषयीचे धोरण जाहीर केले. कर्मचाऱ्याच्या अनप्लग काळात जर त्याला अन्य कर्मचाऱ्याने कामासंबंधीचा फोन केला तर त्याला एक लाख रुपयांचा दंड भरावा लागेल असे स्पष्ट केले. या धोरणामुळे कंपनी कोणत्याही कर्मचाऱ्यावर निर्भर नसल्याचा संदेशही देण्यात आला आहे.
कंपनीच्या या धोरणावर कर्मचारी खूष झाले आहेत. या धोरणामुळे सात दिवसांच्या सुट्टीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून कुठलाच त्रास होणार नाही. कार्यालयाकडून कॉल, ई-मेल, मॅसेज अथवा व्हॉट्सअपवरुन कामाची विचारणा करण्यात येणार नाही.