नवी दिल्ली : या महिन्याच्या 19 तारखेला म्हणजे शनिवारी बँकेशी (Bank) संबंधित एखादे काम करायचे असेल तर ते अगोदर उरकून घ्या. कारण या 19 नोव्हेंबर रोजी देशातील बँकांचे कामकाज ठप्प होणार आहे. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाने (AIBEA) देशभरात संप (Bank Strike) पुकारला आहे.
देशात दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकेला सुट्टी असते. तर पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी बँकांचे कामकाज सुरु असते. पण या 19 नोव्हेंबर रोजी तिसरा शनिवार आहे. या दिवशी कर्मचारी संघटना आक्रमक झाल्याने देशभरातील बँकांचे कामकाज प्रभावित होणार आहे.
सोमवारी बँक ऑफ बडोदाने (BoB) संपाबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाच्या महासचिवाने संपाची नोटीस पाठवली आहे. त्यानुसार संघटनेचे सदस्य 19 नोव्हेंबर रोजी संपावर जात आहेत.
संपाच्या काळात बँकेच्या शाखेतील कामकाज प्रभावित होणार आहे. त्यामुळे बँक ऑफ बडोदा त्यासाठी प्रयत्न करणार आहेत. पण तरीही बँकांच्या शाखा आणि मुख्य कार्यालय प्रभावित होणार आहे.
19 नोव्हेंबर रोजीच्या संपामुळे ATM सेवाही प्रभावित होण्याची स्थिती आहे. त्यामुळे बँकेशी संबंधित काही कामकाज करायचे असेल तर या दिवशीपूर्वीच ते उरकून घ्या. त्यामुळे कामात अडथळा येणार नाहीत.
संघटना सदस्यावर सातत्याने होणारे हल्ले, पदाधिकाऱ्यांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या मनाविरुद्ध बदल्या होत असल्याचे प्रकारही वाढले आहेत. याविरोधात AIBEA चे महासचिव सी एच वेंकटाचलम यांनी काही दिवसांपूर्वी आवाज उठविला होता. पण या प्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा आणि मागणी मान्य कराव्यात यासाठी संपाचे शस्त्र उपसण्यात आले आहे.