नवी दिल्ली : नोकरदार वर्गाचा वेतनातील एक वाटा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO ) खात्यात जमा होते. ही रक्कम तुम्ही गरजेच्या वेळी काढू शकता. त्यासाठी EPFO तुम्हाला युएएन क्रमांक (UAN) देते. या क्रमांकाच्या आधारे तुम्ही पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम (Balance) आणि रक्कम काढू शकता. मुलीचे लग्न, उपचारांवरील खर्च, मुलांचे शिक्षण व इतर कामासाठी तुम्हाला पीएफ खात्यातून रक्कम काढता येते. सर्वच कर्मचाऱ्यांकडे हा युएएन क्रमांक असतो. परंतु, कंपनी बंद पडल्यावर काही कर्मचाऱ्यांकडे हा क्रमांक नसूही शकतो. तरीही त्यांना खात्यातून रक्कम काढता येते.
जर तुमच्याकडे युएएन क्रमांक नसला तरी काळजीचे कारण नाही. ईपीएफओकडे तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असतो. तुम्ही या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन 011-229014016 यावर मिस्ड कॉल देऊन पीएफमधील बँलेन्स तपासू शकता.
विना UAN क्रमांक पीएफ खात्यातून रक्कम काढण्यासाठी तु्म्हाला जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये धाव घ्यावी लागेल. याठिकाणी तुम्हाला एक नॉन-कम्पोजिट फॉर्म भरुन द्यावा लागेल. त्याआधारे तुमच्या पीएफ खात्यातून रक्कम काढता येईल.
पंरतु, ऑनलाईन पीएफ खात्यातून रक्कम काढताना UAN क्रमांक देणे आवश्यक आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड क्रमांकही गरजेचा आहे. त्यानंतरच तुम्हाला पीएफ खात्यातून रक्कम काढता येईल. ऑनलाईन पीएफ काढतांना युएएन क्रमांक महत्वाचा असतो.
निवृत्तीनंतर कर्मचारी पीएफ खात्यातील जमा रक्कम केव्हाही काढू शकतात. याशिवाय नोकरी सोडल्यानंतर त्याला 2 महिन्यानंतर तो ईपीएफमधील सर्व रक्कम काढू शकतो. जर तुमची नोकरी सुटली आणि तुम्ही बेरोजगार असाल तरी तुम्हाला पीएफ खात्यातून रक्कम काढता येईल.
पण नोकरीत असताना तुम्हाला पीएफ खात्यातून रक्कम काढायची असेल तर त्यासाठी निश्चित नियमांचे पालन करावे लागेल. या नियमानुसारच तुम्हाला पीएफ खात्यातून आंशिक रक्कम काढता येईल. अर्ज केल्यानंतर 3 ते 7 दिवसांमध्ये (Working Days) पीएफ खात्यातील रक्कम मिळते.