नवी दिल्ली : सध्या युपीआय ॲपचा (UPI App) बोलबाला आहे. फोन पे, गुगल पे, पेटीएम यासारख्या ॲपच्या माध्यमातून देशात दिवसाकाठी कोट्यवधींचे व्यवहार अगदी सहज होत आहेत. भाजी विक्रेत्यापासून ते मॉलमधील शॉपिंगपर्यंत सगळीकडे सहजरित्या कोणालाही ऑनलाईन व्यवहार (Online Transaction) करता येतो. आकडेवारीनुसार, 2022 मध्ये युपीआय व्यवहाराची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोनानंतरच्या काळात जनतेने ऑनलाईन पेमेंटवर भर दिला. पेमेंट करणे अत्यंत सुलभ, सरळ असल्याने ही प्रणाली लोकप्रिय ठरली. 6 एप्रिल रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने युपीआय युझर्ससाठी (UPI Users) मोठी घोषणा केली. आता उसनवारीसाठी युझर्सला कोणापुढे हात पसरवण्याची गरज नाही. त्यांच्या खात्यात पैसे नसले तरी त्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.
काय केली घोषणा
आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक गुरुवारी संपली. या बैठकीनंतर युपीआय वापरकर्त्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली. ग्राहकांच्या खात्यात छदाम ही नसला तरी त्याला रक्कम मिळणार आहे. त्याच्या खात्यात रक्कम क्रेडिट करण्यात येईल. क्रेडिट कार्डचा जसा वापर करण्यात येतो. तसाच हा वापर असेल. सोप्या शब्दात युपीआय आता तुम्हाला क्रेडिट कार्डसारखे वापरता येईल.
युपीआयला प्रोत्साहन देण्यासाठी योजना
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याविषयीची घोषणा केली. युनिफाईट पेमेंट इंटरफेस (UPI) या माध्यमातून अधिक युझर्सला जोडण्यासाठी, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काही खास योजना आखण्यात येत आहेत. त्यानुसार, आता युपीआयद्वारे क्रेडिट कार्डसारखी सुविधा देण्यात येईल. युझर्सला प्री अप्रूव्हड रक्कम (Pre-sanctioned) देण्यात येईल. खात्यात पैसा नसला तरी वापरकर्त्याला पैसे मिळतील.
या ॲपचा वापर
फोन पे, गुगल पे, पेटीएम यासारख्या ॲपच्या माध्यमातून ही क्रेडिटची सुविधा मिळेल. प्री अप्रूव्हड क्रेडिट लाईन युपीआय पेमेंट करणाऱ्यांना देण्यात येईल. ही राशी बँका, वित्तीय संस्था निश्चित करतील. खात्यात रक्कम नसतानाही खातेदारांना या रक्कमेचा वापर करता येईल. या सुविधेमुळे बँकांच्या क्रेडिट कार्डचे काय होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
क्रेडिट कार्डचा लाभ
नवीन निर्णयानुसार, आरबीआयनुसार, रुपे क्रेडिट कार्डची सुविधा युपीआयच्यामार्फत देण्यात येते. एका अहवालानुसार, BharatPe, Cashfree Payments, Google Pay, Razorpay, Paytm, PayU आणि Pine Labs या ॲपवर क्रेडिट कार्डचा उपयोग करुन पेमेंट करता येईल. त्यासाठीची परवानगी देण्यावर सहमती देण्यात आली आहे. क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड लाभ घेण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
काय आहे युपीआय
युपीआय हे एक रिअल टाईम पेमेंट सिस्टम आहे. मोबाईल अॅपच्या माध्यमातून बँक खात्यातून झटपट रक्कम हस्तांतरीत करण्यासाठी तिचा वापर होतो. युपीआयच्या माध्यमातून तुम्ही बँक खात्याला युपीआयशी जोडू शकता. तसेच अनेक बँक खातेही युपीआय अॅपच्या माध्यमातून वापरु शकता. डिसेंबर महिन्याच्या युपीआय व्यवहारांनी विक्रम नोंदवला आहे. युपीआय व्यवहारांनी एकट्या डिसेंबर महिन्यात 12.82 लाख कोटी रुपये मूल्यांचे 782.9 कोटी डिजिटल पेमेंट ट्रान्झाक्शनचा नवीन रेकॉर्ड केला आहे.