नेटवर्क नसेल तरी कॉल आणि मेसेज करता येणार! बीएसएनएलने लाँच केली सर्व्हिस,जाणून घ्या सर्वकाही

| Updated on: Nov 14, 2024 | 7:20 PM

ग्रामीण भागात गेलं की कायम नेटवर्कची समस्या जाणवते. अनेकदा महत्त्वाचा कॉल आणि मेसेजही करता येत नाही. त्यामुळे काही जण आपला दौरा कमी वेळेतच आटोपता घेतात. मात्र आता तसं करण्याची गरज भासणार नाही. कारण बीएसएनएलने एक सर्व्हिस लाँच केली आहे. चला जाणून घेऊयात कसं काम होतं ते..

नेटवर्क नसेल तरी कॉल आणि मेसेज करता येणार! बीएसएनएलने लाँच केली सर्व्हिस,जाणून घ्या सर्वकाही
Follow us on

टेलिकॉम क्षेत्रात बीएसएनएलने एक क्रांतिकारक पाऊल टाकलं आहे. गेल्या काही महिन्यात बीएसएनएलने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे खासगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जच्या किमती वाढवल्या. दुसरीकडे, बीएसएनएल मात्र जैसे थेच आहे. नुकताच कंपनीने आपला लोगोही बदलला आहे. तसेच देशभरातली जनतेसाठी 7 नव्या सुविधा सुरु केल्या आहेत. सरकारी टेलिकॉम कंपनी भारत दूरसंचार निगम लिमिटेडने देशातील पहिली सॅटेलाईट टू डिव्हाइस सर्व्हिस लाँच केली आहे. दूरसंचार विभागाने सोशल मीडियावर पोस्ट याबाबतची माहिती दिली आहे. म्हणजेच बीएसएनएलवरून कॉल करण्यासाठी किंवा एसएमएस पाठवण्यासाठी आता नेटवर्कची गरज भासणार नाही. बीएसएनएलने यासाठी अमेरिकेच्या विएसाट कंपनीसोबत भागीदारी केली आहे.

बीएसएनएलने पोस्ट केलेल्या एक्स मिडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये एक व्हिडीओ आहे. या व्हिडीओत एक यात्रेकरून डोंगराळ भागातून प्रवास करत आहे. मात्र त्याचं नेटवर्क मधेच जातं. अशा परिस्थितीत त्याला बीएसएनएलची सॅटेलाईट टू डिव्हाईस सर्व्हिस मदत करते. या सर्व्हिसच्या माध्यमातून तो कॉल करतो. या सर्व्हिसचा लाभ घेण्यासाठी तुमच्या डिव्हाईसमध्ये सॅटेलाईट टू डिव्हाईसला सपोर्ट करणारी यंत्रणा असणं गरजेचं आहे.

बीएसएनएलच्या सॅटेलाईट टू डिव्हाईस सर्व्हिसचं ट्रायल पूर्ण झालं आहे. बीएसएनएलच्या या सर्व्हिसमधून इमर्जन्सी कॉल, मेसेज आणि युपीआय पेमेंट करू शकता. आयफोन 14 ने पहिल्यांदा ही सर्व्हिस लाँच केली होती. त्यानंतर इतर मोबाईल कंपन्यांनीही या सर्व्हिसला सपोर्ट करणारे डिव्हाइस बाजारात आणले आहेत.

दरम्यान, बीएसएनएलने भारतात पहिल्यांदाच फायबर आधारित इंट्रानेट टीव्ही सेवा सुरु केली आहे. या सेवेला आयएफटीव्ही असं नाव दिलं आहे. या सुविधेतून युजर्संना लाईव्ह टीव्ही चॅनेल आणि पे टीव्ही सुविधा मिळणार आहे. त्याचबरोबर लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मची मजाही लुटता येणार आहे. यात अमेझॉन प्राईम व्हिडीओ, डिज्नी हॉटस्टार, नेटफ्लिक्स, युट्यूब आणि झी 5 या सुविधाही लवकरच मिळतील, असं बीएसएनएलने सांगितलं आहे.