नवी दिल्ली : नोकरी (Jobs) मिळविणे सध्या सर्वात अवघड आणि तितकीच सोपी बाब आहे. ऑनलाईन नोकरीचे (Online Jobs) तर पेव फुटले आहेत. त्यामुळे नोकरीच्या मागे धावताना तुमची फसवणूक (Fraud) होणार नाही, याची दक्षता घ्या. नाहीतर मनस्ताप तर होईलच पण तुमचा पैसा ही जाईल.
गृहमंत्रालयाने (Ministry of Home Affairs) तरुणांना या नोकरीच्या फसवणुकीपासून सावध रहाण्याचे आवाहन केले आहे. सध्या तरुणांमध्ये सरकारी नोकरीची मोठी क्रेझ आहे. त्यासाठी तरुण वाटेल ती रक्कम मोजायला तयार असतात. सरकारी नोकरीच्या नावाखाली काही धोकेबाज लूट करत असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे सरकारी खात्याचा लोगो आणि शिक्के मारून ऑफर लेटर देण्यात येते. त्यापोटी भलीमोठी रक्कमही लाटण्यात येते. परंतु, हे ऑफर लेटर बोगस असल्याचे सिद्ध झाल्यावर तरुणांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यांची मोठी फसवणूक होते.
अनेकदा पात्रता नसताना तरुणांना मोठ-मोठ्या पदांच्या ऑफर दिल्या जातात. तरुणही मोठ्या पगाराच्या आमिषात पडतात आणि सरकारी नोकरी लागली म्हणून त्यांना गंडविल्या जाते.
कोणी असे जॉब लेटर देत असेल तर सावध रहा. हे ऑफर लेटर नीट तपासून घ्या. त्याची संबंधित सरकारी खात्याकडे खात्री करुन घ्या. यातील काही माहिती नसल्यास लगेच सावध व्हा.
जर ई-मेल द्वारे तुम्हाला ऑफर लेटर पाठविण्यात आले तर त्याची भाषा कशी आहे, यावरुन त्याचा खरे-खोटपणा तपासता येतो. भाषेची अशुद्धता लक्षात येत असल्यास हे ऑफर लेटर बोगस असल्याचे लक्षात घ्या.
जॉब ऑफर दरम्यान तुमच्या घरच्या परिस्थितीचा अंदाज लावण्यात येत असेल. तुमच्याकडे मोठ्या रक्कमेची मागणी करण्यात येत असेल तर सावध रहा. तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
कोणत्याही प्रकारच्या सायबर फ्रॉडमध्ये (Cyber Fraud) तुम्ही अडकला तर त्वरीत याची माहिती पोलिसांना द्या. तुम्ही http://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही तक्रार नोंदवू शकता.