रेल्वे प्रवासात (Railway Travel) चार्ट बनल्यानंतर एखाद्या व्यक्तीने त्याचे तिकीट कॅन्सल केल्यास ती जागा किंवा सीट रिकामी होते. आरएसी किंवा वेटिंगवर (Waiting) असणारे लोक त्या सीटसाठी टीसीकडे विचारणा करतात, मात्र बऱ्याच वेळा ती सीट त्यांना मिळत नाही. काही वेळाने दुसऱ्याच व्यक्तीला ती सीट ॲलॉट केली जाते ( दिली जाते). टीसी मनमानी कारभार करत त्यांच्या फायद्यानुसार सीट देतात. बऱ्याच वेळेस पैसे देऊनही ती सीट घेतल्याचा आरोप केला जातो आणि वेटिंगवर असणाऱ्या लोकांना मात्र सीट रिकामी असूनही त्रास सहन करत प्रवास पूर्ण करावा लागतो. मात्र टीसीच्या या मनमानीला आता चाप लागणार आहे. रेल्वेच्या नव्या नियमानुसार (New rules), चार्ट बनल्यानंतर एखादी जागा रिकामी राहिल्यास, टीसी आता त्यांच्या मर्जीप्रमाणे कोणालाही ती सीट देऊ शकत नाहीत. हा गैरकारभार रोखण्यासाठी रेल्वेने नवे पाऊल उचलले आहे. टीसींना एक हॅंड हेल्ड टर्मिनल मशीन देण्यात येणार असून त्यामध्ये प्रवाशांची संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे.
हा नियम श्रमशक्ती एक्स्प्रेस आणि कानपूर शताब्दी एक्स्प्रेस मध्ये लागू करण्यात आला आहे. सध्या जरी हा नियम दोन गाड्यांपुरता मर्यादित असला तरी हळूहळ तो इतर सर्व गाड्यांमध्येही सुरु होईल. रेल्वेच्या या नव्या नियमानुसार, चार्ट बनल्यानंतर एखादी सीट रिकामी राहिल्यास, योग्य प्रवाशालाच ती सीट मिळेल. टीसी त्यांच्या मर्जीनुसार, कोणालाही ती सीट देऊ शकणार नाही. यासाठी त्यांना एक हँड हेल्ड मशीन देण्यात येणार आहे. एखादी रिकामी सीट ज्या प्रवाशाला देण्यात येईल, त्याची संपूर्ण माहिती त्या मशीनमध्ये नोंदवण्यात येईल. रेल्वे तिकीटाचे भाडे यापासून प्रवाशाबद्दल सगळ्या माहितीची त्यात नोंद करण्यात येईल. तसेच किती वेटिंग असणाऱ्या प्रवाशाला रिकामी सीट देण्यात आली, तेही त्यात नमूद करण्यात येईल.
या नियमामुळे रेल्वे प्रवासातील गैर कारभाराला आळा बसेल. यापूर्वी टीसी त्यांच्या मर्जीने वेटिंगवरील कोणत्याही प्रवाशाला सीट द्यायचे. रेल्वे चार्टमधील त्या रिकाम्या सीटवर ( भरल्याची) खूण करायचे. ही सगळी प्रक्रिया पूर्णपणे कागदोपत्री व्हायची. मात्र हँड हेल्ड मशीनमध्ये असा प्रकार होणार नाही. यामध्ये प्रवाशाची संपूर्ण माहिती द्यावी लागेल, त्यामुळे टीसीने एखादी चूक केल्यास तीही त्यात नोंदवली जाईल. याचा अजून एक फायदा म्हणजे, कोणता प्रवासी कुठल्या स्थानकापर्यंत प्रवास करेल, त्याचे तिकीट किती असेल, याचीही माहिती त्यातून मिळेल. त्या स्टेशनचा कोड टाकल्यानंतर किती भाडे आहे, त्याची रक्कमही समजू शकेल. भविष्यात ही सुविधा सर्व ट्रेन्समध्ये प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ट्रेन सुटण्याच्या 15 मिनिटे आधी या मशीनमध्ये रिझर्वेशन चार्ट डाऊनलोड करावा लागेल. हे मशीन रेल्वेच्या रिझर्व्हेशन क्रिस सर्व्हरशी जोडलेले असेल, त्यामुळे त्यातील सर्व अपडेट रेल्वे विभागाकडे पोहोचतील. वेटिंग किंवा आरएसी निश्चित झाल्यानंतर कोणत्या प्रवाशाला रिकामी सीट देण्यात आली, त्याची सर्व माहिती या मशीनमध्ये व क्रिस सर्व्हरकडे असेल.
ट्रेनमधील गैर कारभार रोखण्यासाठी ही सेवा सुरु करण्यात आली आहे. सध्या ही सुविधा कानपूर शताब्दी, श्रमशक्ती एक्स्प्रेस, प्रयागराज एक्स्प्रेस आणि आगरा- दिल्ली इंटरसिटी या गाड्यांमध्ये उपलब्ध आहे.