पुण्यात राहणाऱ्या रोहनचा भारतातील बँकिंग (bank) आणि आर्थिक क्षेत्रावर मोठा विश्वास आहे. याच विश्वासाच्या जोरावर त्यानं बँकिंग क्षेत्रातील एचडीएफसीमध्ये (HDFC) मोठी गुंतवणूक (Investment)केलीये. एचडीएफसी बँकेतील गुंतवणुकीत फारसा धोका नाही आणि परतावा जास्त मिळेल असं रोहनला वाटत होतं. पण एका वर्षानंतर त्याचा अपेक्षाभंग झाला आहे. एचडीएफसीत गुंतवणूक करण्याऐवजी बँकेत एफडी केली असती तर किमान पैसा गमावण्याची नामुष्की आली नसती, असं रोहनला आता वाटत आहे. गेल्या 2-3 वर्षांपासून एचडीएफसी बँकेच्या शेअरची कामगिरी खराब होत आहे. मग, एचडीएफसी बँकेच्या शेअर्सचं भविष्य काय ? रोहनने या शेअरमध्ये गुंतवणूक करून चूक केली का? एचडीएफसी बँक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देईल की नाही? हा प्रश्न रोहनसारख्या लाखो गुंतवणूकदारांना पडलाय. चला, तर मग सुरूवातीला एचडीएफसी बँकेचा पूर्ण इतिहास जाणून घेऊयात.
एचडीएफसी बँकची स्थापना ऑगस्ट 1994 मध्ये झाली. त्यानंतर 1995 मध्ये आयपीओ आला. त्यावेळी एचडीएफसी बँकेच्या आयपीओची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो. त्यावेळी एचडीएफसीच्या आयपीओची किंमती होती फक्त 10 रुपये तर 39.95 रुपयांवर एचडीएफसीचा शेअर्स बीएसईवर सूचीबद्ध झाला, ऐकून धक्का बसला ना? थोडसं विचार करा, 1995 मध्ये जर तुम्ही एचडीएफसीमध्ये गुंतवणूक केली असती तर छप्परफाड कमाई झाली असती. सध्याच्या किंमतीशी तुलना केल्यास 1432 पट परतावा मिळाला असता. एचडीएफसीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदारांची चांदी झालीये. मग गेल्या काही वर्षांपासून एचडीएफसीमधून परतावा का मिळत नाही ? कुठं चुकतंय आणि काय चुकतंय ? रोहन ज्यावेळी एचडीएफसीच्या तक्त्याकडे पाहतो त्यावेळी त्याचा आणखी हिरमोड होतो.
गेल्या एका वर्षापासून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार एचडीएफसीमधील भागीदारी विकत आहेत. त्यामुळे एचडीएफसीच्या शेअर्सची कामगिरी खराब होत आहे. शेअर होल्डिंग पॅटर्नकडे पाहिल्यावर हे सहज दिसून येतं. महागडे मूल्यांकन हे देखील एचडीएफसी बँकेच्या घसरणीचे आणखी एक कारण आहे. अलीकडील घसरणीनंतरही एचडीएफसी बँक बँकिंग क्षेत्रातील सर्वात महागडा असा शेअर्स आहे. मार्च 2020 मध्ये आरबीआयने एचडीएफसीला ग्राहकांना नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यास मज्जाव केला होता. ही बंदी मार्च 2022 पर्यंत होती. या दोन वर्षातील बंदीमुळे बँकेच्या व्यवसायालाही फटका बसलाय.
आता एचडीएफसी आणि इतर बँकांच्या व्यवसायाची तुलना करूयात. एचडीएफसी बँक ही खासगी क्षेत्रातील सर्वात प्रबळ बँक आहे. त्यामुळे बँकेची आकडेवारी चांगलीच असणार. आकडेवारीची तुलना करताना कोटक महिंद्रा बँकेची आकडेवारी चांगली दिसू शकते. मात्र, एचडीएफसी बँकेच्या तुलनेत कोटक बँकेचं व्यवसायाचं प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे व्यावसायिक तुलनेनुसार एचडीएफसी बँक सर्वात मोठी आणि प्रबळ आहे. एचडीएफसी बँक आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करेल का? या प्रश्नाचे उत्तर तितकं अवघड नाही. बहुतेक ब्रोकर्स एचडीएफसी बँकेच्या बाबतीत आशावादी आहेत. अलीकडच्या काळात एचडीएफसी बँकेची कामगिरी फारसी चांगली नसली तरीही दीर्घकाळाचा विचार केल्यास चांगला परतावा मिळू शकतो.