मुंबई : देशातील सर्वात मोठी गृह कर्जदाता बँक एचडीएफसी लिमिटेडने (HDFC Ltd) पुन्हा एकदा होम लोनच्या व्याज दरात वाढ केली आहे. एचडीएफसी बँकेने होम लोनच्या (Home Loan) रिटेल प्राइम लेंडिंग रेटमध्ये (RPLR) पाच बेसीस पॉईंटने वाढ केली आहे. एचडीएफसी बँकेकडून एका महिन्यात तिसऱ्यांदा व्याज दर वाढवण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात मेमध्ये बँकेकडून व्याज दरात वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा व्याज दर पाच बेसीस पॉईंटने वाढवण्यात आले असून, बँकेचे व्याज दर 7.05 टक्क्यांवर पोहोचले आहेत. पूर्वी ते 7 टक्के इतके होते. समजा जर एखाद्याचा क्रेडिट स्कोर हा 780 असेल तर त्याला मिनिमम व्याज दर 7.05 टक्क्यांनी होम लोन मिळू शकते. नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. बँकेने एका महिन्यात होम लोनचे व्याज दर 40 बेसीसी पॉइंटने वाढवले आहेत. एक मे रोजी व्याज दर 0. 5 टक्क्यांनी वाढवण्यात आले होते. त्यानंतर 7 मे रोजी व्याज दर 30 बेसिस पॉइंटने वाढवण्यात आले, तर आता पुन्हा एकदा त्यामध्ये पाच बेसीस पॉइंटची वाढ करण्यात आली आहे.
भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या महिन्यात रेपो दरात 0.40 टक्क्यांची वाढ केली होती. 0.40 टक्क्यांच्या वाढीसह रेपो रेट 4.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. आरबीआयकडून करण्यात आलेल्या रेपो रेट वाढीनंतर बँकांनी व्याज दरवाढीचा धडाका लावला आहे. अनेक बँकांनी आपल्या विविध प्रकारच्या कर्जांच्या व्याज दरात वाढ केली आहे. व्याज दरात वाढ झाल्याचा थेट फटका हा कर्ज घेणाऱ्यांना बसला असून, ईएमआय महाग झाला आहे. देशात महागाईचा भडका उडाला असून, महागाई निंयत्रणासाठी रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आल्याचे त्यावेळी आरबीआयच्या वतीने सांगण्यात आले होते.
केवळ एचडीएफसी लिमिटेडनेच नव्हे तर आयसीआयसीआय बँक आणि पंजाब नॅशनल बँक या बँकांनी देखील व्याज दरात वाढ केली आहे. आयसीआयसीआय बँकेंचा मिनिमम व्याज दर आता 7.30 टक्क्यांवर पोहोचला आहे. दुसरीकडे पंजाब नॅशनल बँकेकडून आपल्या व्याजदरात 15 बेसीस पॉइंटची वाढ करण्यात आली असून, पीएनबीचा व्याज दर 6.75 टक्क्यांवर पोहोचला आहे. नवे दर आजपासून लागू झाले आहेत.