नवी दिल्ली : कोरोना काळानंतर (Corona) भारतात आरोग्य विम्याचे प्रचलन वाढले. आरोग्य विम्याकडे दुर्लक्ष करणारे भारतीय, अचानक जागरुक झाले. त्यामुळे आरोग्य विमा क्षेत्रात (Health Insurance Sector) पॉलिसी खरेदीचे सर्व रेकॉर्ड तुटले. त्याचा फटकाही विमा कंपन्यांना बसला. या काळात त्यांना अधिकची नुकसान भरपाई मोजावी लागली. आरोग्य विमा स्वस्त असल्याने ग्राहकांच्या उड्या पडल्या होत्या. या नवीन वर्षात विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) कंपन्यांना विमा पॉलिसीचा हप्ता वाढविण्यासाठी हिरवा कंदिल दाखविला. त्यानंतर आता आरोग्य विमा पॉलिसी नुतनीकरण आणि नवीन पॉलिसी खरेदीसाठी ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. त्यांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे.
किती वाढला विमा
आरोग्य विम्यात आता महागाईची लाट आली आहे. वर्ष 2021 पेक्षा यंदा 2023 मध्ये ग्राहकांना आरोग्य विमा खरेदीसाठी अधिक रक्कम द्यावी लागेल. दोन वर्षात प्रीमियममध्ये जवळपास 14 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. नुतनीकरण आणि नवीन पॉलिसी खरेदीसाठी ग्राहकांच्या खिशावर ताण पडेल. महागाई दर सातत्याने वाढत आहे. 2021 वैद्यकीय महागाई दर 14 टक्के होता, आशियाई देशांमध्ये हा खर्च सर्वाधिक आहे. त्यात या दोन वर्षांत आणखी भर पडली आहे. त्यामुळे आरोग्य विम्यावर त्याचा परिणाम दिसून येत आहे.
ग्राहकांकडे काय पर्याय
आरोग्य विमा पॉलिसीच्या हप्त्यात आता वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना नवीन पर्यांयाचा अथवा नुतनीकरताना इतर पर्यायांबाबत जागरुक रहावे लागेल. जर तुम्ही वेळेच्या आधीच विमा पॉलिसीचे नुतनीकरण केले तर तुम्हाला या वाढीव हप्त्याची झळ बसणार नाही. त्यासाठी विमा प्रतिनिधी आणि विमा कंपनीशी बोलून, प्रीमियम कोणत्या तारखेपासून वाढविण्यात येईल, याची माहिती घ्या.
नुतनीकरणासाठी नका पाहू वाट
अनेक ग्राहक, विमा पॉलिसी शेवटच्या तारखेला अपडेट, अद्ययावत करतात. त्यांना हा आळस नडतो. अनेक कंपन्या त्यांच्या विमा पॉलिसीचा हप्ता लवकरच वाढविणार आहे. त्यांनी काही ग्राहकांना सवलत देण्याची शक्यता असते. पण त्यासाठी नुतनीकरणाला विलंब लावता कामा नाही. तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहिली तर पॉलिसी व्यपगत, लॅप्स होण्याची शक्यता असते. अथवा विलंब शुल्कासह दंड ही लागतो. वाढलेला विमा हप्ता पण द्यावा लागतो.
तर पॉलिसी करा पोर्ट
सध्याच्या विमा कंपनीच्या सेवा आणि सुविधेबाबत तुम्ही असमाधानी असाल तर मग तुमच्याकडे इतर पर्याय आहेत. अथवा इतर विमा कंपनी चांगली सेवा आणि सवलत देत असले तर तुम्ही विमा कंपनी बदलवू शकता. तुम्ही पॉलिसी पोर्ट करु शकता. तुमच्याकडून अधिकची रक्कम उकळण्यात येत असेल तर स्वस्त प्रीमियम, ऑफर यासह इतर प्रकारच्या सेवांचा पर्याय तुम्हाला निवडता येतो. चांगला पर्याय मिळाल्यास, ग्राहक विमा कंपनीत बदल करु शकतो.