Health insurance : कंपनी बदलताना ग्रुप हेल्थ इन्शुरन्सचे रुपांतर वैयक्तिक पॉलिसीमध्ये करावे का?, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

| Updated on: Jun 01, 2022 | 5:30 AM

नोकरी बदलताना कर्मचाऱ्याला ग्रुप इन्शुरन्सचे वैयक्तिक पॉलिसीमध्ये रुपांतर करता येते. मात्र ग्रुप इन्शुरन्स वैयक्तिक पॉलिसीमध्ये हस्तांतरित करावा की त्याऐवजी नवीन पॉलिसी खरेदी करावी? असा प्रश्न अनेकांना पडतो.

Health insurance : कंपनी बदलताना ग्रुप हेल्थ इन्शुरन्सचे रुपांतर वैयक्तिक पॉलिसीमध्ये करावे का?, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
Follow us on

जुही आता चार वर्षांनी नोकरी बदलत आहे. जुन्या कंपनीत असलेला सामूहिक आरोग्य विमा (Health insurance) म्हणजेच ग्रुप हेल्थ इन्शुरन्सचे आता काय करावे? हा प्रश्न तिच्यासमोर आहे. कंपनीने तिच्यासह सर्व कर्मचार्‍यांना (Staff) सामूहिक आरोग्य विमा (Group health insurance) दिलाय. बहुतेक कंपन्या ग्रुप हेल्थ विम्याचा हप्ता स्वत: भरतात. कर्मचाऱ्याचे विमा कवच नवीन संस्थेत शिफ्ट होताच संपते. कर्मचाऱ्यासोबतच त्याच्या कुटुंबासाठीही विमा कवच उपलब्ध आहे. नोकरी बदलताना कर्मचाऱ्याला वाटत असल्यास ग्रुप इन्शुरन्सचे वैयक्तिक पॉलिसीमध्ये रुपांतर करता येते. मात्र ग्रुप इन्शुरन्स वैयक्तिक पॉलिसीमध्ये हस्तांतरित करावा की त्याऐवजी नवीन पॉलिसी खरेदी करावी? असा प्रश्न अनेकांना पडतो. आज आपण याचे फायदे तोटे सविस्तर जाणून घेणार आहोत.

हप्ता वाढतो

विमा पोर्टेबिलिटीसाठी पॉलिसीधारक त्याच्या सध्याच्या विमा कंपनीच्या सेवांबद्दल असमाधानी असल्यास विमा कंपनी बदलू शकतो. त्याचप्रमाणे सामूहिक आरोग्य विमा वैयक्तिक विम्यामध्ये हस्तांतरित केला जाऊ शकतो, परंतु ग्रुप इन्शुरन्स पॉलिसीचे वैयक्तिक पॉलिसीमध्ये रुपांतर करताना सध्याची विमा कंपनी बदलता येत नाही. वैयक्तिक विमा देखील त्याच कंपनीकडून घ्यावा लागतो. पोर्टिंग केल्यानंतर एक वर्षांनी पॉलिसीधारकाला दुसऱ्या कंपनीकडे पॉलिसी पोर्ट करण्याची मुभा असते. कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात विमा पॉलिसी खरेदी करतात. यामुळे नाममात्र दरात विमा योजना मिळते. जेव्हा तुम्ही वैयक्तिक विमा खरेदी करता तेव्हा हप्ता वाढतो. बहुतेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना ग्रुप आरोग्य विमा देतात.

वैद्यकीय तपासणी करावी लागते

त्याचप्रमाणे कोणत्याही आरोग्य तपासणीशिवाय ग्रुप हेल्थ इन्शुरन्स मिळतो. परंतु वैयक्तिक आरोग्य विमा घेतल्यास विमा कंपनी वैद्यकीय तपासणी करते. तुमच्या आरोग्याच्या परिस्थितीवर विमा योजनेचा हप्ता निश्चित केला जातो. सामूहिक आरोग्य विम्यात वेटिंग पिरीयड नसतो . ग्रुप इन्शुरन्समध्ये माहिती भरताना पॉलिसीधारकाला त्याच्या सर्व जुन्या आजारांची योग्य माहिती द्यावी लागते. कोणत्याही जुन्या आजारासाठी तुम्हाला रुग्णालयात भरती केले असल्यास आणि आजाराबद्दल नमूद केले असल्यास क्लेम मिळू शकतो. तसेच आजाराची माहिती चुकीची असल्यास तुम्हाला क्लेमसाठी दावा करता येत नाही.

हे सुद्धा वाचा

प्रक्रियेला वेळ लागतो

तुम्ही ग्रुप हेल्थ इन्शुरन्समधून वैयक्तिक विमा योजनेत गेल्यानंतर कंपनी नव्यानं अटी, शर्थी ठेवते आणि नवीन हप्ता निश्चित करते. मग नवीन पॉलिसी खरेदीप्रमाणेच वेटिंग पिरीयडसुद्धा असतो. हा वेटिंग पिरीयड 2 ते 4 वर्षे कालावधीचा असू शकतो. नवीन पॉलिसीमध्ये पूर्वीच्या पॉलिसीचा कोणताही लाभ घेता येत नाही. ग्रुप इन्शुरन्सचे वैयक्तिक विमा योजनेत रुपांतर करण्यासाठी, सध्याच्या पॉलिसीच्या नूतनीकरणाच्या 45 दिवस अगोदर प्रक्रिया सुरू करावी लागते. ग्रुप हेल्थ इन्शुरन्सचे वैयक्तिक विम्यामध्ये रुपांतर करणे सोपे नाही. कंपनीच्या कागदांवर जरी प्रक्रिया सुरू दिसली तरीही नवीन पॉलिसी काढण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते. अशा परिस्थितीत आपल्या गरजेनुसार नवीन विमा घेणे फायद्याचे ठरू शकते.