नवी दिल्ली : बातमीच अशी आहे की, तुम्ही म्हणाल खरंच सांगता की काय? या प्रकरणात भारताने (India) अमेरिकेचा (America) काय तर विकसीत राष्ट्रांनाही मागे टाकले आहे. विशेष म्हणजे बातमी आपल्या सर्वांना आणि विशेषतः नोकरदार वर्गाला दिलासा देणारी आहे. मोठ्या कंपन्यांना जे जमले नाही, ते भारतीय कंपन्यांनी करुन दाखवलं आहे.
तर बातमी आहे पगार वाढ मिळण्याची, भारताने जगातील अव्वल आणि श्रीमंत देशांना मागे टाकले आहे. एका सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. अनेक देशांना मागे टाकत भारतीयांना सर्वाधिक पगार वाढ देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
अमेरिका, ब्रिटेन, चीन, जपान, जर्मनी या देशांपेक्षा येत्या काही काळात भारतात सर्वाधिक पगार मिळतील असाही दावा या सर्वेत करण्यात आला आहे. सध्या कॉर्पोरेट कंपन्यांची कामगिरी जोरदार आहे. 2023 मध्ये भारतात दोन आकडी पगार वाढ होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे.
जगातील प्रोफेशनल सर्व्हिस कंपनी Aon Plc ने त्यांच्या ताज्या सर्वेक्षणात ही बाब समोर आणली आहे. सर्वेनुसार, भारतात 2023 मध्ये मानधनात 10.4 टक्क्यांची वाढ होणार आहे. यावर्षी 2022 मध्ये आतापर्यंत 10.6 टक्क्यांची वृद्धी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. सध्या 9.9 टक्क्यांची वृद्धी गाठण्यात यश आले आहे.
विशेष बाब म्हणजे भारतातील पगारातील वृद्धी आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी दिलेली नाही. तर देशातील कंपन्यांनी त्यांच्या कामगार, कर्मचाऱ्यांना ही पगारवाढ दिलेली आहे.
या सर्वेक्षणासाठी देशातील 40 विविध उद्योगातील 1300 कंपन्यांच्या डाट्यातून हे विश्लेषण करण्यात आले आहे. 2022 मधील पहिल्या सहामाहीत नोकरी सोडणाऱ्यांचे प्रमाण 20.3 टक्के राहिले. त्यामुळे वेतन वाढ करण्याशिवाय कंपन्यांपुढे दुसरा पर्याय राहिला नाही. 46 टक्के कंपन्या दुप्पट वेतन वाढीच्या मूडमध्ये आहे.
सध्या ई-कॉमर्स क्षेत्रात 12.8, स्टार्टअप्समध्ये 12.7, आयटी, हायटेक क्षेत्रात 11.3 तर वित्तीय सेवा पुरवणाऱ्या संस्थांमध्ये 10.7 टक्के वेतन वाढीची शक्यता आहे.