नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी 2,000 रुपयांची नोट चलनातून माघारी घेण्याचा निर्णय घेतला. अर्थात गेल्यावेळी सारखी यावेळी परिस्थिती नाही. गेल्या एक वर्षांपासून अनेक नागरिकांना या नोटेचे साधं दर्शन पण झाले नाही. पण साठेबाजांनी या नोटा दडवूण ठेवल्या आहेत. तर काहींनी भविष्यासाठी पिग्गी बँकेत, तांदळाच्या, गव्हाच्या पोताड्यात, डब्ब्यात या नोटा दडवून ठेवल्या आहेत. 23 मेपासून बँकांमध्ये या नोटा बदलवून (Note Exchange) मिळतील. एका दिवशी 2,000 रुपयांच्या 10 नोटा म्हणजे एकूण 20,000 रुपये बदलता येतील. पण तुम्ही गुलाबी नोट किती वेळा बदलवू शकता, याविषयी आरबीआयचा नियम (RBI Rules) माहिती आहे का?
खात्यात किती नोटा जमा करता येतील
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने त्यांच्या सर्व शाखांना, व्यवस्थापकांना पत्र लिहिले आहे. त्यानुसार, एकावेळी नागरिकांना एकूण 20,000 रुपयांपर्यंत 2,000 रुपये जमा करता येतील. म्हणजे एका दिवशी 20,000 रुपये जमा करता येतील. खात्यात दोन हजारांची रक्कम जमा करण्यासाठी कोणताही अर्ज भरावा लागणार नाही. तसेच दररोज रक्कम जमा करण्याची मर्यादा असली तरी पुढील चार महिन्यांत 2,000 रुपये जमा करता येतील. त्यासंबंधीची कोणतीही मर्यादा देण्यात आली नाही. पण त्यासाठी तुम्हाला खात्याची केवायसी अपडेट (KYC) करावी लागेल.
किती वेळा उभे राहता येईल रांगेत
2,000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांच्या मनात अजूनही संभ्रम आहे. त्यातील एक प्रश्न म्हणजे नोटा बदलण्यासाठी रांगेत किती वेळा उभे राहता येईल. सूत्रांच्या माहितीनुसार, 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी तुम्हाला कितीही वेळा रांगेत उभा राहता येईल. पण एका दिवशी 20,000 रुपयांपर्यंतच नोटा बदलता येतील.
127 दिवसांत बदला 26 लाख
आरबीआयच्या परिपत्रकानुसार, 23 मे 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत 2000 रुपयांच्या नोटा बदलता येतील. ही मर्यादा एका दिवशी 20 हजार रुपायांपर्यंत आहे. म्हणजे 127 दिवसांमध्ये नागरिकांना 25,40,000 रुपये जमा करता येतील.
काळा पैसा पुन्हा येईल बाहेर
आरबीआयच्या माहितीनुसार, सर्व बँकांकडून 23 मे 2023 रोजीपासून 2000 रुपयांच्या गुलाबी नोटा परत घेण्यात येतील. ही प्रक्रिया सोमवारपासून सुरु होईल. पुढील 127 दिवस ही प्रक्रिया सुरु असेल. ही गुलाबी नोट एटीएममधून तर कधीचीच बाद झाली आहे. आता व्यवहारातून पण ही रक्कम बाद होणार असल्याने काळा पैसा बाहेर येईल, अशी आशा आरबीआयला वाटत आहे. गेल्या नोट बंदीवेळी अनेक ठिकाणी बाद नोटा जाळण्याचे प्रकार घडले होते. तसेच बंद झालेल्या नोटांचे बंडल उघड्यावर, नद्यांमध्ये टाकलेले आढळले होते.