नवी दिल्ली : सोने गेल्या आठवड्यात पुन्हा महागले. सोन्याने किंमतीत (Gold Price) नवीन रेकॉर्ड तयार केला. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसात सोन्याच्या किंमती अजून भडकतील. सोन्याचे भाव अजून वाढतील. लग्नसराईातच भाव वधारल्याने वधू-वर मंडळींच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह (Federal Reserve) व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. तसेच अमेरिकेसह अनेक विकसीत देशांना मंदीची भीती सतावत आहे. चीनमधील कोरोनाची अपडेट, रशिया आणि युक्रेन दरम्यानचे युद्ध यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. परिणामी येत्या काही दिवसात सोने रेकॉर्ड ब्रेक (Record Break) करेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
24 कॅरेट सोन्याचा दर शुक्रवारी 57050 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला होता. या भावाने नवीन उच्चांक केला आहे. सोमवारी सोन्याचा दर 56883 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. गेल्या आठवड्याचा विचार करता सोन्यात 167 रुपये प्रति 10 ग्रॅम दरवाढ झाली आहे.
तर चांदीचा भाव शुक्रवारी 68453 रुपये प्रति किलो होता. सोमवारी चांदीचा भाव 69167 रुपये प्रति किलो होता. एका आठवड्यात चांदीच्या भावात 714 रुपये प्रति किलोची घसरण झाली. चांदीची किंमत पुन्हा तिचा जुना उच्चांक गाठण्याची शक्यता आहे.
सोन्याने 20 जानेवारी 2023 रोजी सर्वकालीन उच्चांक तयार केला होता. त्यावेळी सोने 57050 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. चांदीचा सर्वकालीन उच्चांक 75,000 रुपये होता. एप्रिल 2011 रोजी चांदीने हा उच्चांक गाठला होता.
येत्या काही दिवसात सोने प्रति 10 ग्रॅम 60,000 रुपये भाव गाठेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मद्रास ज्वेलर्स अँड डायमंड मर्चेंट्स असोसिएशन नुसार 24 कॅरेट सोने लवकरच 60,000 रुपयांचा दर गाठेल. येत्या अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या किंमती वाढू शकतात.
ibja केंद्र सरकारने घोषीत केलेल्या सुट्यांच्या दिवशी, शनिवार आणि रविवारी दर जाहीर करत नाही. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या किरकोळ भाव जाणून घेण्यासाठी ग्राहकांना 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. याशिवाय एसएमएस करुनही किंमती माहिती करुन घेता येईल.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बेस इंपोर्ट प्राईसमध्ये (Base Import Price) वाढ केली आहे. तर चांदीवरील बेस इंपोर्ट प्राईस घटवली. त्याआधारे सोने-चांदी आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांना आता आयात दर चुकता करावा लागेल.