कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती निधी जमा करते. सोबतच ही संघटना कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन योजनेचा लाभ देते (EPFO Pension Scheme) कर्मचारी भविष्य निधी खात्यातंर्गत कर्मचारी आणि मालक यांच्याकडून एक ठराविक रक्कम पीएफ खात्यात योगदान म्हणून जमा होते. त्यावर केंद्र सरकार वार्षिक व्याज देते. त्याआधारे निवृत्तीपर्यंत कर्मचाऱ्याकडे एक मोठी रक्कम जमा होते. तुम्हाला या योजने अंतर्गत जर कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा करायची असेल तर किती रक्कम योगदान म्हणून द्यावी लागेल?
सरकार किती देते व्याज?
केंद्र सरकार कर्मचारी भविष्य निधी खात्यातंर्गत वार्षिक आधारावर व्याज निश्चित करते. सध्या सरकार पीएफ खात्यातंर्गत 8.25 टक्के व्याज देते. हे व्याज प्रत्येक वर्षाला कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा करण्यात येते. पीएफ खात्यातील या रक्कमेवर कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागत नाही. कारण ही रक्कम कर मुक्त आहे.
गरजेच्यावेळी काढा रक्कम
ईपीएफओ कर्मचारी त्यांना पैशांची गरज असेल, निकड असेल तेव्हा ही रक्कम काढू शकतो. कर्मचारी शिक्षण, लग्न, घराचे बांधकाम, आजारपण या काळात ही रक्कम काढू शकतो. नियमानुसार त्याला ही रक्कम काढण्याचे मुभा आहे. ही रक्कम काढताना त्याला तसे कारण मात्र स्पष्ट करावे लागते. छोट्या मोठ्या रक्कमेसाठी कर्ज काढण्यासाठी पीएफ खात्यातील रक्कम तुमच्या मदतीला येऊ शकते.
निवृत्तीवेळी हवी कोट्यवधींची रक्कम?
निवृत्तीवेळी 3 कोटी रुपयांची रक्कम प्राप्त करण्यासाठी कर्मचाऱ्याला वयाच्या 40 व्या वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला पीएफ खात्यात 8,400 रुपयांचे योगदान द्यावे लागते. मॅच्युरिटीवेळी सध्याच्या 8.25 दराने तुम्हाला एकूण 3,01,94,804 रुपये मिळतील.
जर तुम्हाला निवृत्तीवेळी 4 कोटी रुपये हवे असतील तर 40 वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला 11,200 रुपयांचे योगदान जमा करावे लागेल. सध्याच्या 8.25 दराने तुम्हाला एकूण 4,02,59,738 रुपये मिळतील.
तर निवृत्तीवेळी तुम्हाला 5 कोटी रुपये हवे असतील तर त्यासाठी वयाच्या 40 शी पर्यंत तुम्हाला या खात्यात 12 हजार रुपये प्रत्येक महिन्याला जमा करावे लागतील. सध्याच्या 8.25 दराने तुम्हाला एकूण 5,08,70,991 रुपये मिळतील.