मुंबई : आयसीआयसीआय बँक आणि पंजाब नॅशनल बँकेने एमसीएलआर रेट्स वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या बँकेकडून कर्ज घेतलेल्या ग्राहकांचा ईएमआय वाढला आहे. आयसीआयसीआयने काही मुदतीसाठी व्याज दर कमी केला आहे. तर दुसरीकडे, पंजाब नॅशनल बँकेने सर्व मुदतीसाठी आपल्या व्याज दरात वाढ केली आहे. नवीन दर 1 जूनपासून लागू झाले आहेत. बँकांनी नवीन दर आपल्या वेबसाईटवर अपलोड केले आहेत. आयसीआयसीआयने एक महिन्याचा एमसीएलआर 8.50 टक्क्यांवरून 8.35 टक्के केला आहे. तर तीन महिन्याचा एमसीएलआरमध्ये 15 बेसिस पॉईंटची घट केली आहे. पण या व्यतिरिक्त इतर मुदतीसाठी आयसीआयसीआयने एमसीएलआरमध्ये वाढ केली आहे.
आयसीआयसीआयने सहा महिने आणि एक वर्षाच्या मुदतीसाठी बीपीएसमध्ये 5 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. बँकेने 6 महिन्यांच्या कर्जावरील दर 8.75 टक्के केला आहे. तर एक वर्षाच्या कर्जावरील दर 8.85 टक्के केला आहे. दुसरीकडे, पीएनबीने सर्व मुदतीवरील व्याज दर वाढवला आहे. पीएनबीने व्याजदरात 0.10 टक्क्यांची वाढ केली आहे.
पीएनबीने एक वर्षाच्या कर्जावरील व्याज दर 8.60 टक्के, तीन वर्षाच्या कर्जावरील व्याजदर 8.90 टक्के केला आहे. याचबरोबर बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व मुदतीच्या कर्ज दरात वाढ केली आहे. बँकेने एमसीएलआर दरात 0.05 टक्क्यांना वाढ केली आहे. नव्या दरानुसार एक वर्षासाठी व्याजदर आता 8.65 टक्क्यांवर पोहोचला आहे.
बँकेकडून जाहीर करण्यात आलेल्या एमसीएलआर टेन्योरमध्ये जर तुम्ही होम लोन घेतलं असेल तर ईएमआय वाढणार आहे. दुसरीकडे, ज्या मुदतीमध्ये आयसीआयसीआयने घट केली आहे, त्या काळात कमी व्याजदर भरावा लागणार आहे.