ATM Transaction Limit News : युपीआय व्यवहारांमुळे (UPI Transaction) बँक एटीएमच्या (ATM) व्यवहारांवर परिणाण दिसत असला तरी अनेक जण अजूनही रोखीत व्यवहार करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे बँकेच्या एटीएमची पायरी चढण्यापूर्वी तुम्हाला कितीदा रक्कम काढता येते, याचा नियम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. नाही तर बँकेने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा तुम्ही अधिक वेळा रक्कम काढली तर तुम्हाला त्याचा भूर्दंड सहन करावा लागेल. कारण पुढचा सर्व व्यवहार हा सशुल्क असेल. एटीएम व्यवहार मर्यादा अनेकदा तुमच्याकडे असलेल्या खात्याच्या प्रकारावर आणि तुम्ही वापरत असलेले डेबिट कार्ड यावर अवलंबून असते. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने ATM व्यवहारांसाठी नियम लागू केलेले आहेत. खासगी आणि सरकार बँका आरबीआयने घालून दिलेल्या नियमानुसार आणि शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील एटीएमनुसार तुमच्याकडून मर्यादेबाहेरील व्यवहारांसाठी शुल्क आकारतात. तुम्ही SBI, HDFC, ICICI बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी.
SBI च्या अधिकृत संकेतस्थळानुसार, मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता, हैदराबाद आणि बंगळूरु या शहरात 3 विनामूल्य व्यवहारांसाठी (फक्त बचत बँक खातेधारकांसाठी) पात्र आहात. तर इतर शहरातील बचत खातेदारांसाठी 5 विनामूल्य व्यवहार (आर्थिक आणि गैर-आर्थिक) ही मर्यादा ठेवण्यात आली आहे. देशभरातील 1.5 लाख एटीएममधून (एसबीआयसहीत इतर बँका) तुम्ही हा व्यवहार करु शकता.
या मर्यादेव्यतिरिक्त ग्राहकाने व्यवहार केल्यास, त्याला या आर्थिक व्यवहारांसाठी इतर बँक एटीएमसाठी 20 + GST आणि SBI ATM साठी 10 + GST इतके शुल्क प्रत्येक व्यवहारासाठी मोजावे लागेल.
तसेच गैर आर्थिक व्यवहारांसाठी इतर बँकांच्या ATM चा वापर केल्यास 8 + GST आणि SBI ATM साठी 5 + GST शुल्क द्यावे लागेल.
एवढेच नाही तर SBI बँक एटीएम आणि इतर बँक एटीएम दोन्हीमध्ये पुरेशी शिल्लक नसल्यामुळे नाकारलेल्या व्यवहारांसाठी बँक 20 + GST शुल्क आकारते.
ICICI बँकेने इतर बँकांच्या एटीएममधून रोख पैसे काढण्यासाठी 10,000 रुपयांची मर्यादा ठेवली आहे. खातेदारांना ICICI बँकेच्या ATM मध्ये केलेले पहिले पाच व्यवहार (आर्थिक आणि गैर-आर्थिक दोन्ही) विनामूल्य आहेत. त्यानंतर प्रत्येक आर्थिक व्यहारासाठी 21 रुपये तर गैर आर्थिक व्यवहारांसाठी 8.50 रुपये जीएसटी शुल्कासह मोजावे लागतील. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता, हैदराबाद आणि बंगळूरु या शहरात 3 विनामूल्य व्यवहारांसाठी (फक्त बचत बँक खातेधारकांसाठी) पात्र आहात. तर इतर शहरातील बचत खातेदारांसाठी पहिले 5 व्यवहार (आर्थिक आणि गैर-आर्थिक)विनामूल्य आहेत.
एचडीएफसी बँकेने ही इतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी, प्रति व्यवहार 10,000 रुपयांची कमाल मर्यादा ठेवली आहे. बचत आणि पगारदार ग्राहकांसाठी दरमहा 5 व्यवहार विनामूल्य आहेत. विनामूल्य व्यवहारांच्या अधिकृत संख्येपेक्षा जास्त रोख पैसे काढण्यासाठी, HDFC बँक 21 रुपये अधिक तर गैर आर्थिक व्यवहारांसाठी 8.50 रुपये जीएसटीसह आकारते.