नवी दिल्ली : म्युच्युअल फंडमध्ये SIP केल्यास गुंतवणूकदारांना जोरदार फायदा होतो. पण त्यासाठी योग्य म्युच्युअल फंडाची निवड आणि दीर्घकालीन गुंतवणूक ही दोन्ही महत्वाची सूत्र लक्षात ठेवावी लागतात. जर एखाद्या व्यक्तीने नोकरी सुरु करताच म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीद्वारे (Mutual Fund SIP) गुंतवणूक केल्यास त्याला उतारवयात कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडत नाही. त्याला तगडा परतावा मिळतो. पण फारच कमी गुंतवणूकदारांना ही गोष्ट समजते. अनेक जण तीन वा पाच वर्षांनी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक काढतात आणि त्यांना मोठी रक्कम उभी करता येत नाही. विशेष म्हणजे शेअर बाजारातील (Share Market) चढउताराचा थेट परिणाम तुमच्या गुंतवणूकीवर होत नाही, त्याची झळ मात्र बसते. मग म्युच्युअल फंडातून करोडपती कसे होता येईल?
लवकर गुंतवणूक महत्वाची
म्युच्युअल फंडात जितक्या लवकर गुंतवणूक कराल, तेवढा तुमचा फायदा होईल. जर एखादी व्यक्ती एसआयपीद्वारे दरमहा 25 हजार रुपयांची गुंतवणूक करत असेल तर त्याला मोठा फायदा होईल. पुढील 25 वर्षांत त्याचा फंड मोठा होईल. प्रत्येक महिन्याला 25 हजारांची गुंतवणूक म्हणजे वर्षाला 3 रुपये जमा होतील. 25 वर्षे या गुंतवणुकीत खंड न पडू दिल्यास तुम्ही 75 लाख रुपयांची गुंतवणूक कराल.
असा मिळेल परतावा
म्युच्युअल फंडवर सरासरी 12 टक्के परतावा गृहीत धरला. तर 25 वर्षानंतर तुमच्या गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याजा आधारे ही रक्कम 5 कोटी रुपयांच्या जवळपास होईल. या रक्कमेवर तुम्हाला कर द्यावा लागेल. काही म्युच्युअल फंड 15 टक्के परतावा देतात. त्यामुळे हा आकडा अजून वाढू शकतो.
दरवर्षी वाढवा रक्कम
तुम्हाला लवकर करोडपती व्हायचे असेल तर म्युच्युअल फंडमधील गुंतवणूकीत दरवर्षी काही ना काही वाढ करणे फायदेशीर ठरेल. म्युच्युअल फंडात तुम्हाला सरासरी 12 टक्के परतावा नाही मिळाला तर ही रक्कम तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपयोगी ठरेल. समजा तुम्ही दर महा 25 हजारांची गुंतवणूक करत असाल तर पुढील वर्षी 27,000 रुपयांची गुंतवणूक करा. त्याच्या पुढील वर्षी अजून ही रक्कम वाढवा. त्यामुळे कमी कालावधीत तुम्हाला तुमचे लक्ष्य गाठता येईल.
बाजारातील घसरणीला घाबरु नका
शेअर बाजारात चढउतार होते. त्यामुळे त्याला घाबरुन म्युच्युअल फंडातील रक्कम कमी करु नका. जर तुम्ही पडत्या काळात अधिकची गुंतवणूक केली आणि पुढील काही वर्षात म्युच्युअल फंडाने जोरदार कामगिरी बजावली तर ही अधिकची गुंतवणूक तुम्हाला छप्परफाड कमाई मिळवून देऊ शकते. तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरु कराल. तेवढा तुम्हाला अधिकचा फायदा होईल. कोणत्याही परिस्थितीत तुमची एसआयपी थांबवू नका नाही तर तुम्हाला दीर्घकालावधीनंतर अपेक्षित परतावा मिळणार नाही.