नवी दिल्ली : डिजिटल इंडिया (Digital India) ही केवळ घोषणाच राहिली नाही, तर आता प्रत्येक क्षेत्रात डिजिटल क्रांती पोहचली आहे. बँकिंगच्या (Banking) माध्यमातून डिजिटल ही संकल्पना आपण अनुभवत आहोत. आता त्यापुढे जात, डिजिटल रेस्टॉरंटही (Digital Restaurant) तुमच्या शहरात लवकरच दिसू लागतील. खाद्य जगतातील अनेक मोठे ब्रँड्सनी यासाठीची तयारी सुरु केली आहे.
यामध्ये पहिले नाव येते ते केएफसी इंडियाचे (KFC India). या ब्रँडने देशात गुरुग्राम, हैदराबाद, चेन्नई आणि बेंगळुरू याठिकाणी डिजिटल रेस्टॉरंटची सुरुवात केली आहे. त्याच पावलावर पाऊल टाकत इतर अनेक ब्रँड्सही डिजिटलची संकल्पना अंमलात आणणार आहेत.
या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना स्वतःच ऑर्डर बूक करावी लागते. त्याला मेन्यूतून त्याचा इच्छित खाद्यपदार्थ निवडता येतो. त्यामध्ये काही ऑफर आणि कॉम्बोचीही त्याला निवड करता येणार आहे. त्याच ठिकाणी त्याला पेमेंट ही ऑनलाईन अदा करता येईल. थोड्याचवेळात त्याला त्याची ऑर्डर मिळेल.
या स्मार्ट रेस्टॉरंटमध्ये स्टेट ऑफ दी आर्ट सेल्फ ऑर्डरिंग कियोस्क बसविण्यात आलेले असतात. त्यावर तुम्हाला खाद्य पदार्थ निवडण्याची मूभा असते. ग्राहकाला ऑर्डर करून डिजिटल पेमेंट करता येते. केएफसी या वर्षात अजून 10 रेस्टॉरंट सुरु करणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, दिल्लीतील कॅनॉट प्लेसमधील अर्देर 2.01 हे देशातील पहिले डिजिटल रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही क्रिप्टो करंसीमार्फतही पेमेंट करु शकता. हे रेस्टॉरंट 2021 मध्ये सुरु करण्यात आले होते.
येत्या काही वर्षात, साधारणतः 2030 पर्यंत देशात डिजिटल बँक ही सामान्य बाब होईल, असा अंदाज बांधण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्फिनिटी मंचच्या उद्धघाटना दरम्यान बँकेच्या शाखेत डिजिटल बँक करण्याचा विचार बोलून दाखविला होता.