नवी दिल्ली | 19 जुलै 2023 : देशात दररोज जवळपास 11,000 रेल्वे धावतात. त्यातून कोट्यवधी प्रवाशी प्रवास करतात. देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी रेल्वे (Indian Railway) हा चांगला पर्याय आहे. स्वस्त आणि वेळ वाचविणारा प्रवासासाठी अनेक भारतीय रेल्वेचा वापर करतात. एसी क्लास आणि इतर डब्ब्यांमध्ये तर खाद्यपदार्थांची सेवा रेल्वेकडून करण्यात येते. पण जनरल डब्ब्यातील (General Coach) प्रवाशांना अशी कोणतीही सुविधा देण्यात येत नाही. त्यामुळे त्यांना रेल्वे स्टेशन (Railway Station) येण्याची वाट पहावी लागते. पण आता जनरल कोचमधील प्रवाशांना पण पोटभर जेवणाची सुविधा सुरु करण्यात आली आहे. देशातील अनेक रेल्वे स्टेशनवर ही सोय करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील या रेल्वे स्टेशनचा यामध्ये समावेश आहे.
स्वस्तात जेवण
प्रवाशांना अवघ्या 20 रुपयांमध्ये पोटभरुन जेवण करता येईल. रेल्वे विभागाने देशातील 51 रेल्वे स्थानकावर ही सुविधा सुरु केली आहे. इतर स्टेशनवर लवकरच ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे. जेवणाचे हे स्टॉल रेल्वे स्टेशनवर असतील. जनरल डब्बे ज्या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर थांबतात. त्याच्या अगदी समोरच जेवणाचा हा स्टॉल असेल.
काय आहे मेनू
IRCTC च्या किचन युनिट्सकडून ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. अगदी स्वस्तात प्रवाशांसाठी जेवणाची सोय करण्यात आली आहे. 20 रुपयांमध्ये प्रवाशांना 7 पुऱ्या, बटाट्याची कोरडी भाजी आणि लोणचं मिळेल.
कोम्बो ऑफर
या कॉम्बो ऑफर अंतर्गत 50 रुपयात राजमा/छोले, खिचडी/पोंगल, कुलचे/भटूरे, पावभाजी आणि मसाला डोसा मिळेल. तर केवळ तीन रुपयात पिण्याच्या पाण्याची 200 मिलीची बाटली मिळेल.
सहा महिन्यांचा प्रयोग यशस्वी
रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वे प्रवाशांना या सुविधेसाठी व्यवस्था करण्यास सांगितले आहे. याला एक्सटेंडेड सर्व्हिस काऊंटर्सचे नाव देण्यात आले आहे. ही सेवा गेल्या सहा महिन्यांपासून प्रायोगिक तत्वावर सुरु होती. आता आयआरसीटीसी अतंर्गत देशातील अनेक रेल्वे स्टेशनवर ही सुविधा देण्यात येत आहे. सर्वसामान्य प्रवाशांचे हित लक्षात घेत या भोजनासाठी केवळ 20 रुपये खर्च करावे लागतील.
कुठे मिळेल स्वस्तात जेवण
देशातील अनेक रेल्वे स्टेशनवर स्वस्तात जेवणाची सुविधा मिळेल. जनरल क्लासच्या डब्ब्यांजवळच जेवणाचे हे काऊंटर असतील. त्यासाठी विभागीय रेल्वे प्रशासन सुविधा उपलब्ध करेल. यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर, पुणे, भुसावळ या शहरांचा समावेश आहे. रेल्वे विभागाने देशातील 51 रेल्वे स्थानकावर ही सुविधा सुरु केली आहे. इतर स्टेशनवर लवकरच ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे. जेवणाचे हे स्टॉल रेल्वे स्टेशनवर असतील.