जीडीपीला महागाईचा फटका, गेल्या आर्थिक वर्षात जीडीपी 8.7 टक्क्यांवर, वित्तीय तुटीत घसरण

| Updated on: May 31, 2022 | 7:16 PM

मार्च तिमाहीच्या जीडीपीचे आकडे जाहीर झाले आहेत. अपेक्षेप्रमाणे जीडीपीवर वाढती महागाई आणि ओमिक्रॉनचा प्रभाव दिसून आला आहे. चौथ्या तिमाहीत जीडीपीचा दर 4.1 टक्के एवढा राहीला आहे.

जीडीपीला महागाईचा फटका, गेल्या आर्थिक वर्षात जीडीपी 8.7 टक्क्यांवर, वित्तीय तुटीत घसरण
Follow us on

मुंबई : मार्च तिमाहीच्या जीडीपीचे (GDP) आकडे जाहीर झाले आहेत. अपेक्षेप्रमाणे आर्थिक विकास दरावर वाढती महागाई (Inflation) आणि ओमिक्रॉनचा प्रभाव दिसून आला आहे. आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत देशाच्या आर्थिक विकास दरात 4.1 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीसह गेल्या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 8.7 टक्के एवढा राहिला आहे. तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत चौथ्या तिमाहीमध्ये जीडीपीचा वेग मंदावल्याचे दिसून येते. तिसऱ्या तिमाहीमध्ये जीडीपी 5.4 टक्के एवढा होता. मात्र 2020-21 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीचे आकडे समाधानकारक आहेत. 2020-21 मध्ये अर्थव्यवस्थेला कोरोनाचा (Corona)मोठा फटका बसला होता. त्यावर्षी चौथ्या तिमाहीत जीडीपी अवघा 2.5 टक्के एवढाच होता. मात्र त्यानंतर हळूहळू कोरोनाचे निर्बंध उठत गेल्याने अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा झाल्याचे पहायला मिळाले.

जीडीपीमध्ये वीस बेसीस पॉइंटची घसरण

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जीडीपी 8.9 टक्के इतका राहू शकतो असे एनएसओने आपल्या सुधारीत अंदाजात म्हटले होते. मात्र 2022 च्या सुरुवातीला देशावर ओमिक्रॉनचे सावट निर्माण झाले. ओमिक्रॉनचा प्रभाव हा आर्थिक व्यवहारांवर झाला. परिणामी चौथ्या तिमाहीत जीडीपी घसरला. कॅगने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी भारताचा जीडीपी 8.7 टक्के एवढा राहिला प्रत्यक्षात, तो 8.9 टक्के राहाण्याचा अंदाज होता. मात्र त्यात वीस बेसीस पॉइंटची घसरण झाली आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात कोरोना आणि महागाईचा फटका अर्थव्यवस्थेला बसल्याने जीडीपीमध्ये घसरण झाली.

हे सुद्धा वाचा

वित्तीय तुटीमध्ये घट

मात्र दुसरीकडे समाधानकारक बाब म्हणजे गेल्या आर्थिक वर्षात वित्तीय तुटीचा जो अंदाज लावण्यात आला होता, त्या अंदाजापेक्षा वित्तीय तूट चांगली राहीली आहे. गेल्या आर्थिक वर्षात वित्तीय तूट जीडीपीच्या 6.9 टक्के एवढी राहू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र त्यामध्ये घट झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात वित्तीय तूट जीडीपीच्या तुलनेत 6.71 टक्के एवढी राहीली. वित्तीय तूट म्हणजे उत्पन्नापेक्षा अधिक खर्च होणे. कोविडमुळे सरकारच्या उत्पन्नात घट झाली होती. मात्र दुसरीकडे कोविड काळात खर्च मोठ्याप्रमाणात वाढला होता. त्यामुळे मागील वर्षी वित्तीय तूट 6.9 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात वित्तीय तूट 6.71 टक्के एवढी राहीली.