Changes in ITR: प्राप्तिकर परताव्यासाठी अर्ज (ITR) भरणार असाल तर नव्या फॉर्मवर एक नजर टाका. आयटीआरच्या नव्या स्वरूपात काही बदल करण्यात आले आहेत. फॉर्म भरण्यापूर्वी हे बदल जाणून घेणे आणि समजून घेणे महत्वाचे आहे. विशेषत: जे क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrency) गुंतवणूक करत आहेत अथवा त्यांनी यापूर्वीच गुंतवणूक केली आहे, त्यांनी एकदा नवीन फॉर्म नक्कीच तपासला पाहिजे. यावेळच्या अर्थसंकल्पात क्रिप्टो टॅक्सची (Crypto Tax) तरतूद करण्यात आली आहे. क्रिप्टो कर क्रिप्टो करप्रणालीवर बसवण्यात आला आहे. या तरतुदींचे कोणतेही उल्लंघन होऊ नये म्हणून तुम्हाला टॅक्स रिटर्न फायलिंगमध्ये (Tax Return Filing) क्रिप्टो इन्व्हेस्टमेंट दाखवावी लागेल. तसे न केल्यास दंड होऊ शकतो. तसेच नव्या आयटीआर फॉर्ममध्ये बदल करण्यात आला आहे. परदेशी सेवानिवृत्ती खात्यासाठी स्वतंत्र कॉलम तयार करण्यात आला आहे. आपल्याला या स्तंभात परदेशी सेवानिवृत्ती खात्याची माहिती नोंदविणे आवश्यक आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) नुकतेच 2021-22 या आर्थिक वर्षासाठी आयटीआर फॉर्म अधिसूचित केले आहेत. यात करदात्यासाठी (taxpayer) काही अतिरिक्त तपशीलांचा समावेश आहे. हा तपशील माहीत नसेल तर करदात्याला फॉर्म भरताना अडचण येऊ शकते. नव्या बदलानुसार या फॉर्ममधील वेळापत्रकात करदात्याला परदेशी मालमत्तेची माहिती देणे आवश्यक आहे. नव्या आयटीआरच्या कलम एफए(FA)नुसार, 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या कॅलेंडर वर्षात जर कोणाकडे परदेशी मालमत्ता असेल तर त्याचा खुलासा करावा लागेल. जानेवारी 2022 मध्ये एखादी मालमत्ता खरेदी केल्यास त्याचा खुलासा 2021-22 या आर्थिक वर्षासाठी आयटीआरमध्ये करावा लागणार नाही, तर 2022-22 च्या कर विवरणपत्रात त्याचा उल्लेख करावा लागणार आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयटीआरमध्ये क्रिप्टो गुंतवणूक दर्शवणे आवश्यक झाले आहे. क्रिप्टो गुंतवणुकीची माहिती देण्यासाठी नव्या स्वरूपात स्वतंत्र कॉलम नाही. बिटकॉइन किंवा इथरियम सारख्या क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतविणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही बाब चिंताजनक आहे. यासंदर्भात चार्टर्ड अकाउंटंट आणि टॅक्स एक्सपर्ट सुनील गर्ग यांनी मत नोंदवले आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये क्रिप्टोमधून कमाई करणाऱ्या लोकांना सामान्य तरतुदींनुसार कर भरावा लागेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नव्या आयटीआर फॉर्ममध्ये बदल करण्यात आला आहे. हा बदल करण्यात आला आहे तो फॉरेन रिटायरमेंट अकाऊंट संदर्भात.परदेशी सेवानिवृत्ती खात्यासाठी स्वतंत्र कॉलम तयार करण्यात आला आहे. आपल्याला या स्तंभात परदेशी सेवानिवृत्ती खात्याची माहिती प्रदान करणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे परदेशी निवृत्ती खाते असेल आणि त्या खात्यातून तुम्हाला मिळकत होत असेल तर रिटर्नमध्ये याची माहिती द्यावी लागेल.कलम 89 अ अन्वये करसवलतीचा दावा केला असेल तर त्याचीही माहिती द्यावी लागणार आहे. करदात्याला 1 एप्रिल 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंतच्या आपल्या सर्व विदेशी संपत्तीची माहिती द्यावी लागणार आहे. या सर्व गोष्टींचा उल्लेख करनिर्धारण वर्ष 2022-23 च्या कर विवरणपत्रात करावा लागेल. एकूणच तुम्हाला आयटीआर फॉर्ममधील नवे बदल पाहून त्यानुसार टॅक्स रिटर्न भरावं लागेल.