नवी दिल्ली : जर तुम्ही पब्लिक प्रोव्हिडंड फंड (PPF) आणि सुकन्या समृद्धी योजनेत (SSY) गुंतवणूक करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. जर तुम्ही या दोन्ही योजनांमध्ये कमीत कमी गुंतवणूक करण्यास विसरला असाल, अथवा तुम्ही चालढकल केली असेल तर आताच या आर्थिक वर्षातील गुंतवणूक पूर्ण करा. पीपीएफ आणि एसएसवाय या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 ही आहे. या योजनांच्या खाते उघडणाऱ्या प्रत्येकाला दरवर्षी किमान एक रक्कम गुंतवावी लागते. पीपीएफ योजनेत एका आर्थिक वर्षात कमीत कमी 500 रुपये आणि SSY मध्ये एका आर्थिक वर्षात किमान 250 रुपये जमा करणे आवश्यक आहे.
किमान निधी न जमा केल्यास काय होईल
जर तुम्ही PPF आणि SSY खात्यात सध्याच्या आर्थिक वर्षात किमान रक्कम जमा केली नाही तर काय होते. तर त्याचा परिणाम लागलीच दिसून येतो. तुमचे सध्याचे खाते निष्क्रिय होते. त्या खात्यातून रक्कम काढता येते नाही. हे खाते पुन्हा सुरु करण्यासाठी, सक्रिय करण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागतो. त्यासाठी या 31 मार्च पर्यंत या खात्यात कमीत कमी रक्कम नक्की जमा करा. त्यामुळे हे खाते सक्रीय होईल.
पोस्टातील योजनांबाबत काळजी घ्या
जर तुम्ही पोस्टात सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडले असेल तर मात्र अधिक काळजी घ्यावी लागेल. तुम्ही या खात्यात कमीत कमी रक्कम जमा केली नाही. एका आर्थिक वर्षात किमान रक्कम जमा करण्यात तुम्हाला जमले नाही तर मग फटका बसतो. तुम्ही दंड जमा केल्यावरही सुकन्या समृद्धी योजनेचे खाते पुन्हा सक्रीय होत नाही. हे खाते आपोआप बचत खात्यात हस्तांतरीत होते. म्हणजे तुमचे उद्दिष्ट तुम्हाला पूर्ण करता येत नाही. तुम्हाला पुन्हा हे खाते उघडावे लागते. पण तोपर्यंत एक वर्ष वाया जाते.
PPF खाते कसे होईल सक्रीय
जर तुमचे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचे, PPF चे खाते निष्क्रिय झाले तर बँक असो वा पोस्ट खाते, याठिकाणी तुम्हाला अर्ज करावा लागेल. यामध्ये मोठा आर्थिक फटका बसतो. तुम्हाला ज्या वर्षापासून हे खाते पुन्हा सक्रिय करायचे आहे, तेव्हापासून या खात्यात दरवर्षी किमान 500 रुपये जमा करावे लागेल. तसेच दरवर्षी 50 रुपये दंड जमा करावा लागेल. या खात्याचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे.
SSY खाते कसे करा सक्रिय
जर तुम्ही SSY खात्याला पुन्हा सक्रिय करु इच्छित असाल तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. पोस्ट ऑफिस अथवा बँक याठिकाणी जिथे खाते असेल तिथे अर्ज दाखल करावा लागेल. या खात्यात दरवर्षी कमीतकमी 250 रुपये जमा करावे लागतील. दरवर्षी 50 रुपयांचा दंड भरावा लागेल. तर ज्या वर्षी खाते सक्रिय करत आहात, त्यावर्षी किमान रक्कम जमा करावी लागेल. या खात्याचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे.