नवी दिल्ली : सध्याचा काळ हा महागाईचा (Inflation) आहे. त्यामुळे अनेक गरजा भागविण्यासाठी, मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्यांना कर्जाला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. बँका, वित्तीय संस्थांकडून काही कागदी प्रक्रिया पूर्ण केल्यावर कर्ज मिळते. काही वेळा कर्ज घेतल्यानंतर ही वर खर्चासाठी पैसा अपुरा पडतो, अशावेळी बँका ग्राहकांना लोन टॉप-अपची (Loan Top Up) सुविधा देतात. त्यामुळे पुन्हा कर्ज घेताना कुठलीच अडचण येत नाही, अथवा कागदपत्रांची झंझट नसते. हे अतिरिक्त कर्ज तात्काळ मंजूर होते. पण लागलीच मंजूर करण्यात येते म्हणून कर्ज घेण्याचा सपाटा लावणे कितपत योग्य ठरते? याबाबत तज्ज्ञांचे मत तर जाणून घ्या..
ग्राहकांना मिळते सुविधा
वैयक्तिक, गृह कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना टॉप-अप लोन मिळते. हे अतिरिक्त कर्ज तात्काळ मंजूर करण्यात येते. ही एकप्रकारची ॲड ऑन सुविधा आहे. सध्याच्या कर्जदारांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँका त्यांच्या खात्यात अधिकची रक्कम जमा करतात. अर्थात टॉप-अप कर्जावर अतिरिक्त व्याज मोजावे लागते. तुमच्या सध्याच्या कर्जावरील व्याजापेक्षा हे व्याज वेगळे जमा करावे लागते. विविध बँकांचा अतिरिक्त कर्जावरील व्याजदर वेगवेगळा आहे.
काय आहेत व्याजदर
एचडीएफसीच्या गृहकर्जावरील टॉप-अपचे व्याजदर सध्या 8.30 ते 9.15 टक्क्यांदरम्यान आहेत. एसबीआयचा व्याजदर 7.90 ते 10.10 टक्के, ॲक्सिस बँकेचा व्याजदर 7.75 ते 8.40 टक्के, युनियन बँक 6.80 ते 7.35 टक्के, बँक ऑफ बडोदा 7.45 ते 8.80 टक्के तर सिटी बँक लोन टॉपअपवर 6.75 टक्के व्याज आकारते.
टॉप-अपचे फायदे काय
बँका तुम्हाला सध्याच्या कर्जावरील व्याजदरापेक्षा कमी व्याजदरात हे अतिरिक्त कर्ज मंजूर करतात. टॉप-अप लोन घेतल्यानंतरही तुमच्या कर्जाचा कालावधी वाढत नाही. तुम्हाला पुन्हा कागदी कार्यवाही पूर्ण करावी लागत नाही. तुमच्याकडे तारण ठेवण्यासाठी मालमत्ता, वस्तू नसली तरी हे कर्ज मिळते. तुम्ही घराच्या सजावटीसाठी, डागडुजीसाठी अतिरिक्त कर्ज घेऊ शकता.
तरच घ्या कर्ज
जर तुमच्याकडे अगोदरच कर्ज असेल आणि तुम्हाला पुन्हा पैशांची गरज असेल तर हे अतिरिक्त कर्ज घ्या. वेगवेगळे कर्ज काढण्यापेक्षा सध्याच्या कर्जावर टॉप-अप लोन घेतल्यासह इतर कर्जाची डोकेदुखी थांबेल. अशावेळी टॉप-अप लोन हे फायदेशीर ठरते. परंतु, टॉप-अप कर्ज महागात पडत असेल तर नवीन कर्ज घेणे हा चांगला पर्याय ठरु शकतो. अर्थात टॉप-अप कर्जावर अतिरिक्त व्याज मोजावे लागते. तुमच्या सध्याच्या कर्जावरील व्याजापेक्षा हे व्याज वेगळे जमा करावे लागते. विविध बँकांचा अतिरिक्त कर्जावरील व्याजदर वेगवेगळा आहे.