नवी दिल्ली: गुंतवणुक अनेकांच्या प्राधान्याचा विषय ठरतो. गुंतवणुकीचे एकाधिक मार्ग उपलब्ध आहेत. सार्वजनिक भविष्य निर्वाह (PUBLIC PROVIDENT FUND) निधी म्हणजेच पीपीएफ हा गुंतवणुकीचा (INVESTMET WAY) सर्वोत्तम मार्ग मानला जातो. खात्रीशीर परताव्यासोबतच करात सूट आणि भांडवल हमीची सुरक्षा मिळते. अन्य सूक्ष्म बचत योजनांच्या तुलनेत पीपीएफ ही सर्वोत्तम योजना मानली जाते. त्यामुळे तुम्ही गुंतवणुकीच्या विचारात असल्यास तुमच्यासाठी पीपीएफ सर्वोत्तम योजना ठरू शकते. तुम्ही पीपीएफ मध्ये गुंतवणूक करू इच्छित असल्यास त्या संबंधित पाच मुद्दे स्पष्ट व्हायलाच हवे. पीपीएफ व्याज दर, लॉक-इन-पिरियड(LOCK IN PERIOD), विद्ड्रॉल, पीपीएफ कालावधी, कर्ज या मुद्द्यांविषयी तुम्हाला तपशीलवार माहिती असायला हवी.
पीपीएफचा व्याज दर निश्चित नसतो. सरकारच्या दहा वर्षाच्या बाँडवर आधारित असतो. व्याज दर निश्चित नसणे म्हणजे दिवसागणिक बदल असा होत नाही. प्रत्येक तिमाहिला व्याज दराची निश्चिती केली जाते. व्याज दरावर पीपीएफ रिटर्नचं गणित ठरतं. बाँडचे रिटर्न वाढल्यास पीपीएफ रिटर्नमध्ये देखील वाढ होते.
पीपीएफ अकाउंटचा लॉक-इन कालावधी 15 वर्षांचा असतो. अकाउंट उघडल्याच्या तारखेपासून लॉक-इन कालावधीची गणना केली जात नाही. अकाउंटमध्ये पहिल्यांदा जमा केलेल्या तारखेनुसार लॉक-इन कालावधी ठरवला जातो.
उदाहरणार्थ, तुम्ही 26 जुलै 2019 तारखेला अकाउंटमध्ये पहिल्यांदा जमा केले होते. लॉक-इन कालवधीची गणना आर्थिक वर्ष 2019-20 समाप्ती तारखेपासून म्हणजेच 31 मार्च 2020 पासून केली जाईल. तुमचे अकाउंट एक एप्रिल 2035 तारखेला मॅच्युअर होईल. त्यापूर्वी तुम्ही पैसे काढू शकणार नाही.
आपत्कालीन परिस्थितीत पीपीएफ मधून पैसे काढण्याला मुभा आहे. मात्र, तुम्ही आंशिक पैसे काढू शकतात. अकाउंट उघडल्यानंतर 6 वर्षानंतर अकाउंट धारक 50 टक्के रक्कम काढू शकतो.
पीपीएफवर कर्ज सुविधा उपलब्ध आहे. पीपीएफ अकाउंट उघडल्यानंतर तीन ते सहा वर्षादरम्यान कर्ज घेऊ शकतो. गेल्या आर्थिक वर्षात जमा रकमेच्या 25 टक्के रक्कम कर्ज स्वरुपात घेऊ शकतो. कर्ज घेतेवेळी असलेल्या व्याजदराहून एक टक्का अधिक व्याज कर्ज घेतेवेळी अदा करावे लागेल. समजा, सध्या पीपीएफ वरील दर 7.1 टक्का आहे. कर्ज 8.1 टक्क्यांनी उपलब्ध होईल.