नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) आज नवी दिल्लीमधील प्रगती मैदानावर बायोटेक स्टार्टअप एक्सपो 2022 (Biotech Startup Expo 2022) चे उद्घाटन केले. यावेळी बोलताना गेल्या आठ वर्षांमध्ये भारतात बायो इकॉनॉमी (Bio Economy) आठ पटीने वाढल्याचे त्यांनी म्हटले. बायो-इकॉनॉमी गेल्या आठ वर्षांमध्ये दहा अब्ज डॉलरवरून 80 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. बायो-इकॉनॉमीत टॉप टेन असलेल्या देशांमध्ये लवकरच भारताचा समावेश होईल. आठ वर्षांपूर्वी देशात स्टार्टअपची संख्या अवघी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी होती. मात्र आता ती संख्या वाढून सत्तर हजारांवर पोहोचल्याचे मोदींनी सांगितले. दरम्यान या कार्यक्रमावेळी मोदींनी आयटी अभियंत्यांचे देखील कौतुक केले आहे. सध्या जगभरात आमच्या आयटी अभियंत्यांचा डंका आहे. हीच अपेक्षा आम्ही बायोटेक क्षेत्रामधून ठेवली असल्याचे देखील यावेळी मोदींनी म्हटले आहे.
Delhi | Prime Minister Narendra Modi along with Union Ministers Dr Jitendra Singh, Piyush Goyal and Dharmendra Pradhan attends Biotech Startup Expo 2022 pic.twitter.com/zwCQjhHT1A
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) June 9, 2022
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, भारत ही बायोटेक क्षेत्रासाठी संधींची भूमी आहे. याची महत्त्वाची पाच कारणं आहेत. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे भारताची लोकसंख्या, दुसरं कारण येथील जैवविविधतेने परिपूर्ण असलेले पर्यावरण, वैविध्यपूर्ण हवामान, तिसरं कारण म्हणजे भारत व्यवसाय करण्यासाठी मिळून देत असलेल्या संधी तसेच येथील सरकारचे व्यवसाय सुलभ धोरण, चौथं कारण म्हणजे येथील तरुणांकडे उच्च क्षमता आहे, येथील तरुणांकडे नवकल्पनांचा खजिना आहेत आणि पाचवं कारण म्हणजे भारताचे बायोटेक क्षेत्र होय.
दरम्यान यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात स्टार्टअप वेगाने वाढत असल्याचे म्हटले आहे. आठ वर्षांपूर्वी स्टार्टअपची संख्या खूप कमी होती. मात्र गेल्या आठ वर्षांमध्ये स्टार्टअपचा आकडा वाढून सत्तर हजारांवर पोहोचल्याचे मोदींनी म्हटले आहे. अनेक व्यवसायिक स्टार्टअपच्या माध्यमातून आपला व्यवसाय चांगला चालवत आहेत. नवे स्टार्टअप सुरू करू इच्छिनाऱ्या तरुणांना सरकारच्या व्यवसाय सुलभ धोरणांची मदत मिळत असल्याचे देखील यावेळी मोदींनी म्हटले आहे.