मुंबई : जर तुम्ही सध्याच्या घडीला सोन्यात गुंतवणूक (Investment In Gold) करु इच्छित असाल तर सध्याच्या काळात त्यासाठी सर्वात चांगला ठरु शकतो. कारण येत्या काही दिवसात सोन्याचा दर (Gold Rate) वाढण्याची शक्यता आहे. सोने 52 हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.
वायदे बाजारातील तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसात सोन्यात मोठी दर वृद्धी होण्याची दाट शक्यता आहे. सध्या बाजारात सोन्याचे दर सातत्याने वाढत आहे. भारतीय सराफा बाजारात गेल्या आठवड्यात तेजी दिसून आली.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) संकेतस्थळानुसार, या आठवड्याच्या(31 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर) सुरुवातीला 31 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,480 रुपये होता. तर शुक्रवारी हा दर वाढून 50,522 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
केडिया अॅडव्हायझरीचे एमडी अजय केडिया यांच्या मते, या वर्षाच्या अखेरीला सोन्याचा भाव 52 हजार रुपये होण्याची शक्यता आहे. आता सोन्याचे दर वाढण्याची शक्यता का आहे, हे पाहुयात..
डॉलर निर्देशांक मजबूत झाला की, सोन्याच्या किंमती नियंत्रणात राहतात. तर डॉलर कमकूवत झाला तर सोन्याच्या किंमतीत वाढ होते. डॉलर इंडेक्स जेवढा कमकूवत होईल, तेवढे सोन्याचे दर वाढतील. सध्या हाच ट्रेंड लागू होण्याची शक्यता आहे.
याशिवाय भू-राजकीय वादाचाही परिणाम दिसून येणार आहे. युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम सोन्याच्या भावावर होत आहे. युद्ध सुरु झाल्यापासून सोन्याचा भाव वधरला आहे. या दोन्ही देशातील युद्धाला विराम मिळण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे भाव चढाच राहण्याची शक्यता आहे.
अमेरिका आणि युरोपात महागाईचा भडका उडाला आहे. त्यामुळे व्याजदर वाढला आहे. मंदीच्या भीतीने गुंतवणूकदारांनी इक्विटी आणि रिअल इस्टेट मार्केटऐवजी सोन्यात गुंतवणुकीचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे सोन्याचा भाव वाढण्याची दाट शक्यता आहे.
ऑगस्ट 2020 मध्ये सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर जवळपास 56,500 रुपयांवर पोहचला होता. तर या वर्षी मार्च महिन्यात हा दर 55,400 रुपये इतका होता. त्यानंतर मात्र सोन्याच्या किंमतीत घसरण सुरु होती.