मुंबई, नवजात बालकांच्या जन्मानंतर (New Born Baby) त्यांची नोंद सरकारी दस्तऐवजात येईपर्यंत त्यांचे वय 5 ते 10 वर्षे होते. त्यामुळे अनेक वेळा त्या मुलाचे नाव किंवा आई-वडिलांचे नाव, जन्मतारीख यामध्ये घोळ होतो. अशा मुलांना भविष्यात खूप त्रास सहन करावा लागतो. मात्र आता नवजात बालकांच्या जन्म प्रमाणपत्रासोबतच त्यांच्या आधार क्रमांक नोंदणीची (Aadhar card) सुविधाही उपलब्ध व्हावी, असा सरकारचा मानस आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील शासकीय स्त्री रुग्णालयात संतोष व सुरेखा जाधव यांची मुलगी भावना हिचे जन्मल्यावर अवघ्या 6 मिनिटात आधार कार्ड व जन्म दाखला देण्याचे रेकॉर्ड 24 सप्टेंबर 2017 रोजी करण्यात आला, जन्मल्यावर सर्वात कमी वेळेत आधारचे हे रेकॉर्ड देशात आजही कायम आहे.
इतक्या कमी वेळेत आधार कार्ड करुन पालकांना एक प्रेरणा मिळावी व जनजागृती करण्यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयाने हा पुढाकार घेतला. तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एकनाथ माले हे स्वतः त्यावेळी हजर होते. भावनाचा जन्म दुपारी 12.03 ला झाल्यावर 12.09 ला तिला आधार कार्ड व जन्म दाखला रुग्णालयातून मिळाला. आधार गर्ल असलेली भावना आता 5 वर्षाची असून ती या रेकॉर्डमुळे देशभरातील माध्यमातुन प्रसिद्धीच्या झोतात आली होती. हाच उपक्रम आता इतर राज्यांमध्ये देखील राबविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
नवजात बालकांच्या आधार क्रमांक नोंदणीसह त्यांच्या जन्म प्रमाणपत्राची सुविधा येत्या काही महिन्यांत सर्व राज्यांमध्ये उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या 16 राज्यांमध्ये नवजात बालकांच्या आधार नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. ही प्रक्रिया 1 वर्षापूर्वी सुरू झाली. आता अनेक राज्ये त्यात सामील होत आहेत. इतर राज्यातही या दिशेने काम सुरू आहे.
केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने येत्या काही महिन्यांत ही सुविधा सर्व राज्यांमध्ये सुरू होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. 5 वर्षापर्यंतच्या मुलांची बायोमेट्रिक माहिती घेतली जात नाही. बायोमेट्रिक डेटा संकलित केला जातो जेव्हा मूल 5 वर्षांचे असते आणि नंतर 15 वर्षांचे असते.
आता जन्म प्रमाणपत्रासह मुलाचे आधार जारी केले जातील. यासाठी UIDAI भारताच्या रजिस्ट्रार जनरलसोबत काम करत आहे. या प्रक्रियेसाठी संगणकावर आधारित जन्म नोंदणी प्रणालीची आवश्यकता असून ही सुविधा उपलब्ध असलेल्या राज्यांमध्ये सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या 16 राज्यांमध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर जन्म प्रमाणपत्र जारी केले जाते तेव्हा त्याची माहिती UIDAI प्रणालीला पाठवला जातो. यानंतर, मुलाचा फोटो आणि पत्ता यासारखे तपशील प्राप्त होताच त्याचा आधार क्रमांक तयार केला जातो.