नवी दिल्ली : देशातील रेल्वे स्टेशन्स (Indian Railway Station) येत्या काही काळात कात टाकतील. या रेल्वे स्टेशनचे रुपडे पालटणार आहे. अस्वच्छ, घाणेरडी रेल्वे स्टेशन लवकरच हद्दपार होतील. मोदी सरकारने रेल्वेच्या सुधारणेवर भर दिला आहे. रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्यावर सध्या जोर देण्यात येत आहे. त्यासाठी अनेक प्रकल्प, योजना हाती घेण्यात आल्या आहेत. मॉडेल रेल्वे स्टेशन (Model Railway Station) तर विमानतळांनाही मागे टाकतील, अशा योजना हाती घेण्यात आल्या आहेत. ही अनोखी रेल्वे स्टेशन पाहुन तुम्ही तोंडात बोट घातल्याशिवाय राहणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अजून एक आयडिया दिली आहे. त्यानुसार, रेल्वे स्थानकाच्या छतावर आता रुफ प्लाझा (Roof Plaza) सुरु करण्यात येणार आहे. याठिकाणी प्रवाशांना खाद्य पदार्थांचा तर आस्वाद घेताच येईल, पण त्यांना खरेदीचाही आनंद लुटता येईल.
गेल्या महिन्यात कॅबिनेटची बैठक झाली. त्यात देशातील रेल्वे स्टेशनच्या पूनर्निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनचा कायपालट होणार आहे. रेल्वे स्टेशनचा विमानतळाच्या धरतीवर विकास करण्यात येणार आहे. विमानतळावर एकाबाजूने आत येता येईल. तर दुसऱ्या बाजूने बाहेर पडता येईल. त्यामुळे गर्दी होणार नाही. तर 2026 पर्यंत देशात बुलेट ट्रेन (Bullet Train) धावण्याची शक्यता आहे.
सुरुवातीला देशातील 50 रेल्वे स्थानकांवर रुफ प्लाझा सुरु करण्यात येणार आहे. याविषयीचा आढावा आणि डिझाईन पंतप्रधानांना दाखविण्यात आले. पण त्यांनी त्यावर पूर्ण समाधान व्यक्त केले नाही. पुढील 50 वर्षांतील बदल लक्षात घेऊन हा प्रकल्प हाती घेण्यात यावा अशी सूचना त्यांनी केली. त्यामुळे आता डिझाईनमध्ये बदल करण्यात येणार आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी सांगितले की, देशात जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यावर पंतप्रधान मोदी यांचा भर आहे. नागरिकांना आधुनिक जगातील सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यादृष्टीनेच रेल्वेचा, रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे.
सध्या गतिमान, गतिशील रेल्वेसाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. त्यादृष्टीनेच वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Train) सुरु करण्यात आल्या आहेत. देशातील अनेक राज्यांनी वंदे भारत ट्रेनची मागणी केलेली आहे. आज मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या मार्गावर वंदे भारत ट्रेनची सेवा सुरु होत आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक चार वंदे भारत ट्रेन धावत आहेत.
रेल्वे स्टेशन आधुनिक करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. त्यादृष्टीनेच आता रेल्वे स्टेशनवर रुफ प्लाझा होणार आहे. यामध्ये वेटिंग एरिया, स्थानिक उत्पादने, फुड कोर्ट, मुलांच्या खेळण्याचे ठिकाण, इतर वस्तूंची खरेदी करता येईल.