नवी दिल्ली : कारमधील (Four-Wheeler) प्रवाशांच्या सुरक्षेसाठी (Safety) केंद्र सरकारने आज एक मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आता कारमध्ये 6 एअरबॅग (Airbags) सक्तीची घोषणा केली. या निर्णयामुळे रस्ते अपघातात किड्या-मुंगीसारखे माणसं मरणार नाहीत, हे नक्की.
प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा नुकताच मुंबईच्या जवळ रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर आता केंद्र सरकारने कारमध्ये 6 एअरबॅगची सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून ही सक्ती लागू करण्यात येणार होती. पण नंतर सरकारने यावर घुमजाव केले.
प्रत्येक कारमध्ये आता वाहन उत्पादक कंपन्यांना 6 एअरबॅग लावाव्या लागतील. अर्थात पुढील वर्षी 1 ऑक्टोबरपासून हा निर्णय अंमलात येणार आहे. कंपन्यांना यासाठी आणखी एक वर्षाची केंद्र सरकारने वेळ वाढून दिली आहे. त्यामुळे कार उत्पादक कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.
या निर्णयामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल टाकले आहे. पण या निर्णयामुळे बजेटमधील कार आता महाग होण्याची दाट शक्यता आहे. कार उत्पादक कंपन्यांनी सरकारच्या या निर्णयाला सुरुवातीपासूनच विरोध केला आहे.
या निर्णयामुळे प्रोडक्शन कॉस्ट वाढणार असल्याने कंपन्यांनी या निर्णयाला विरोध केला होता. तर केंद्र सरकार एअरबॅग सुविधा देण्यावर ठाम होते. सध्या देशात दोन एअरबॅगची सक्ती आहे. त्यात आता आणखी चार एअरबॅगची भर पडणार आहे. कारची किंमत 50 ते 60 हजार रुपयांनी वाढणार असल्याचे कंपन्यांचा दावा आहे.
कारमध्ये 6 एअरबॅग असत्या तर 2020 मध्ये 13,000 हून अधिक लोकांचे प्राण वाचले असते, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. या एका निर्णयामुळे प्रवाशांचे, वाहनधारकांचे प्राण वाचणार आहे. नियम न पाळणाऱ्या कार उत्पादक कंपन्या वठणीवर येणार आहेत.