भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्राय (TRAI) लवकरच कॉलर्सच्या केवायसी (KYC)वर आधारित यंत्रणेवर काम सुरू करू शकते. सध्या, एखाद्याने तुम्हाला कॉल केल्यास, फक्त त्याचा नंबर स्क्रीनवर दिसतो, परंतु ट्रायच्या या फ्रेमवर्कला अंतिम रूप दिल्यानंतर, तुम्हाला फोनवर वापरकर्त्याचे केवायसी नावदेखील दिसेल. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ट्राय लवकरच फोन स्क्रीनवर कॉलर्सची केवायसी आधारित नावे फ्लॅश करण्यासाठी एक यंत्रणा तयार करण्याचे काम सुरू करू शकते. या यंत्रणेनंतर, जेव्हा कोणी तुम्हाला फोनवर कॉल करेल तेव्हा त्याचे नाव स्क्रीनवर फ्लॅश होईल. यामुळे फ्रॉड कॉलच्या समस्येवरही तोडगा निघणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या ट्रू कॉलरच्या (Truecaller) माध्यमातून समोरील व्यक्ती किंवा त्याने रजिस्टर केलेल्या नावाची आपल्याला माहिती होत आहे.
हे फीचर ट्रू कॉलरप्रमाणे काम करेल. दूरसंचार विभागानेही ट्रायला यावर काम सुरू करण्यास सांगितले आहे. ट्रायचे अध्यक्ष पीडी वाघेला म्हणाले की, पुढील काही महिन्यांत यावर बैठक होउन चर्चेला सुरूवात होऊ शकते. ते म्हणाले, ‘आम्हाला याबाबतची माहिती मिळाली असून ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करता यावर लवकरच काम सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. एखाद्याला कॉल केल्यावर त्याचे नाव केवायसीनुसार दाखवले जाईल. ट्राय आधीच अशा यंत्रणेचा विचार करत होती, परंतु दूरसंचार विभागाच्या पुढाकाराने याला लवकरच मुर्त स्वरुप मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आता नेमके ही सुविधा ग्राहकांना कधी मिळणार आहे, यासाठी काही पैसे मोजावे लागणार की विनाशुल्क ही सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध होणार याची उत्सूकता ग्राहकांना लागून राहिली आहे.
पीडी वाघेला म्हणाले, की जर ही यंत्रणा सक्षम ठरली तर दूरसंचार विभागाच्या नियमांनुसार कॉल करणाऱ्याचे नाव टेलिकॉम कंपन्यांनी केलेल्या KYCनुसार फोन स्क्रीनवर दिसेल. हे फीचर आणल्यानंतर यूजर्स फेक कॉल्स टाळू शकतील. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, फ्रेमवर्क पूर्ण झाल्यानंतर या फीचरबाबत आणखी काही गोष्टी स्पष्ट होतील. सध्या Truecallerसारखे कॉलिंग अॅप्स अशी अशा सुविधा देत असल्या तरी, यामध्ये वापरकर्त्यांच्या KYCवर आधारित नावे दिसत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, हे फीचर आल्याने स्पॅम आणि फसवणूक कॉलचे वाढते प्रमाण कमी होईल. ग्राहकांनाही या सुविधेची प्रतीक्षा लागून आहे.