Consumer Forum | बीएमडब्ल्यू कार ( BMW Car) खरेदीसाठी ग्राहकाने (Consumer) शोरुमकडे दोन लाख रुपये आगाऊ रक्कम दिली होती. पण काही तांत्रिक कारणामुळे त्याला बीएमडब्ल्यू कार घेता आली नाही. ग्राहकाने शोरुमकडे (Showroom) दोन लाख रुपये परत मागितले असता हा मुद्दा पुणे येथील लवादासमोर येत असल्याची सबब पुढे करत ग्राहकाला रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यासाठी विक्री कराराचा हवाला देण्यात आला. विक्री करारामध्ये ग्राहक हिताविरुद्ध अटी टाकल्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याचे उल्लंघन झाले. ग्राहकाने त्याविरोधात औरंगाबाद येथील ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे (Consumer Forum) धाव घेतली होती. सुनावणीअंती अर्जदाराने आगाऊ म्हणून भरलेली रक्कम 2 लाख रुपये तसेच मानसिक त्रासा पोटी 10 हजार रुपये आणि तक्रारीचा खर्च म्हणून 5 हजार रुपये आणि दंडात्मक नुकसान भरपाई म्हणून 15 हजार रुपये एक महिन्याच्या आत द्यावेत असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा स्मिता कुलकर्णी, सदस्य किरण ठोले, संध्या बारलिंगे यांनी दिला आहे.
सिडकोतील नागरिक सुरेंद्र रामकिशन जैस्वाल यांनी बीएमडब्ल्यू कार खरेदी साठी बावरिया मोटर्स एमआयडीसी चिकलठाणा यांच्याकडे 26 फेब्रुवारी 2019 रोजी धनादेशाद्वारे 2 लाख रुपयांची आगाऊ रक्कम भरली होती. उर्वरित रक्कम कार विक्रीनंतर दिली जाईल असे ठरले होते. कारची नोंदणी करताना अर्जदार जैस्वाल यांनी स्वतःच्या नावे नोंदणी केली होती. मात्र पुढे तांत्रिक अडचण आल्याने त्यांनी चेअरमन असलेल्या आदर्श विद्यानिकेतन संस्थेच्या नावाने कार घेण्याचे ठरवले, परंतू त्यांना धर्मदाय आयुक्तांकडून ना हरकत मिळाले नाही. त्यामुळे जैस्वाल यांनी कारची नोंदणी रद्द करून 2 लाख रुपये परत करावे अशी विनंती केली.
परंतु बावरिया मोटर्सने ही रक्कम परत दिली नाही. तसेच कायदेशीर नोटीसलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे जैस्वाल यांनी ग्राहक आयोगात दावा दाखल केला. करारातील अट क्र. 6 आणि 7 मध्ये दोन्ही पक्षातील तक्रारी या पुणे अधिकार क्षेत्रातील लवादामार्फत सोडवण्यात येतील असे स्पप्ट असल्याने अर्जदाराची तक्रार नामंजूर करावी असा पवित्रा बावरिया मोटर्सतर्फे घेण्यात आला. मात्र अट क्र.11 मध्ये रक्कम परत दिली जाणार नाही, असे नमूद आहे. विक्री करारामध्ये ग्राहक हिताविरुद्ध अटी टाकलेल्या असून करार हा छापील स्वरूपात आहे. त्यामुळे ग्राहकांना नोंदणीवेळी छापील करारावर स्वाक्षरी केल्याशिवाय पर्याय उरत नाही. करारात एकतर्फी अटी टाकून बावरिया मोटार्सने ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 2(46) नूसार अनुचित करार केला आहे, असा निष्कर्ष आयोगाने काढला.