दिव्या मित्तल, आयएएस अधिकारी
Image Credit source: social media
मुंबईः मुलांना घडवणं (Parenting) हे काम जगात सर्वात आव्हानात्मक. पूर्वी हे काम फक्त आईचं होतं. पण आता बाबाही तितकाच जबाबदार झालाय. मुलांना समजून घेतोय. एकुलत्या एक मुलासाठी किंवा घरातल्या पाल्यांसाठी उत्तम पालक होण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा पालकांसाठी IAS टॉपर दिव्या मित्तल (Divya Mittal) हिने काही खास पॅरेंटिंग टिप्स शेअर केल्या आहेत. आईनं तिला आणि भावंडांना ज्या पद्धतीनं घडवलं, त्यातून ते कसे शिकत गेले आणि जीवनातल्या मोठ्या आव्हानांसाठी तयार झाले, हे तिने टिप्सच्या माध्यमातून सांगितलंय. दिव्या मित्तलने शेअर केलेल्या पॅरेंटिंग टिप्स (Parenting Tips) खऱ्या अर्थाने पालकांसाठी उपयुक्त ठरतील.
आयएएस अधिकारी दिव्या मित्तलने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली. तिला दोन मुली आहेत. आईने दिलेल्या शिकवणीनुसार ती मुलींना वाढवण्याचा प्रयत्न करतेय, असे तिने म्हटलंय. आईने आम्हा तिघा भावंडांनाही असंच घडवलं. त्यामुळेच आम्ही IIT, IIM क्रॅक करू शकलो, असं तिने सांगितलंय.
12 टिप्स पुढीलप्रमाणे-
- मुलांना हवं ते करु देत. ते करू शकतात, असं नेहमी म्हणत रहा. यातून त्यांच्यात विश्वास निर्माण होतो. या विश्वासातूनच ते घडत राहतात.
- त्यांना उड्या मारू देत, खेळू देत, पडू देत. पडलं की उचलायला जाऊ नका. त्यांना स्वतः उठू देत. अंगाला लागलेली धूळ झटकू देत आणि पुढे चालू देत.
- स्पर्धांमध्ये भाग घेऊ द्या. प्रत्येक वेळी ते जिंकणार नाहीत. पण अपयश पचवण्याची सवय होईल. अपयशाची भीती हा यशाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असतो.
- त्यांना रिस्क घेऊ द्या. निरीक्षण करा. पण तुम्हाला जखिमीचं वाटणारं काम करू द्या. क्रीडा स्पर्धा, झाडावर चढणं इ. या प्रक्रियेत ते धोका आहे, हे कळतं तेव्हा ते जबाबदारीनं वागतात.
- तुम्हाला न मिळालेल्या संधी आणि सुविधा त्यांच्याकडे आहेत. त्या वापरू देत. याचा वापर करून उंच क्षितिजं गाठू देत. तुमची संकुचित मानसिकता त्यांच्यावर लादू नका.
- आदर्श ठेवा. तुम्ही त्यांना ज्या सूचना देतायत, त्या आधी तुम्ही पाळा. पालकांच्या बोलणं आणि कृतीतील विरोधाभास मुलांसाठी सर्वाधिक त्रासदायक प्रकार असतो.
- मुलं चुकीची वागत असल्यास त्यांना रागवा. बरोबर काय ते सांगा. योग्य काय आहे, हे त्यांना समजलं पाहिजे.
- विश्वास ठेवा. अविश्वास दाखवू नका. त्यांच्याबाबत आशादायी रहा. तुम्हीच त्यांच्याकडून आशा सोडली तर ते स्वतःवरचा विश्वास गमावून बसतील.
- अनुभव द्या. त्यांची मनं मोकळी होण्यासाठी असंख्य अनुभव द्या. त्यांना अनाथाश्रमात न्या. नृत्याचे कार्यक्रम दाखवा. प्रवास करा. संग्रहालय दाखवा. जिथे जिथे जाल, तिथल्या गोष्टींबद्दल बोला. स्वतःतच गुंतून राहू नका..
- त्यांचं बोलणं नीट ऐका. लहान आहेत, त्यांना काही कळत नाही, असं समजू नका. त्यावर तत्काळ प्रतिक्रिया देऊ नका. लक्षपूर्वक ऐका आणि मग बोला. मग ते ऐकत नाहीत, अशी तुमचीही तक्रार राहणार नाही.
- मुलाची कुणाशीही तुलना करू नका. विशेषतः भावंडांशी. एकाला झुकतं माप दिलं तर त्याला जगातला वाईटपणा कळणार नाही. आणि एकाला सारखं वाईट बोललं तर तो नेहमीच चांगल्या वागणुकीच्या शोधात राहील.
- सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्यांना तुमच्याजवळ सुरक्षित वाटावं. निरपेक्ष प्रेम मिळावं. तो तुमच्यावर चिडला तरी तुम्ही नेहमीच त्याच्यावर प्रेम करता, हे सांगा. ते कोणत्याही स्थितीत, तो कसाही वागला तरी बदलणारं नाही, हे पटवून द्या.