दिवाळीच्या दिवशी छोटा असो वा मोठा, प्रत्येक उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक लक्ष्मीची पूजा करतो. त्यांच्यासाठी ही एखाद्या नवीन वर्षाची सुरुवात असते. नवीन वही खातं, चोपडीची सुरुवात दिवाळीच्या दिवशीच करण्यात येते. सरकार देशात व्यावसायिक, उद्योजकांना पाठबळ देण्याचे काम करत आहे. ज्यांना व्यवसाय, उद्योग सुरू करायचा आहे, अशा व्यक्तींना सरकारने मुद्रा योजनेचे पाठबळ दिले आहे. शुक्रवारी सरकारने अजून एक मोठी घोषणा केली. आता मुद्रा लोनची मर्यादा दुप्पट करण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे.
केंद्र सरकारने पंतप्रधान मुद्रा योजनेतंर्गत (PMMY) कर्जाची अधिकत्तम मर्यादा वाढवून 20 लाख रुपये केली आहे. पूर्वी ही मर्यादा 10 लाख रुपये होती. मुद्रा लोन अतंर्गत केंद्र सरकार विविध श्रेणीतील व्यावसायिक, छोटे-मोठे उद्योजकांसाठी, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी विना हमी कर्जाचा पुरवठा करते.
अर्थसंकल्पात केली होती घोषणा
मोदी सरकारने जुलै महिन्यात सरकारने आर्थिक वर्ष 2024-25 मधील संपूर्ण अर्थसंकल्पाची घोषणा केली होती. तेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याविषयीची घोषणा केली होती. त्यानुसार सरकार मुद्रा योजनेची मर्यादा दुप्पट करणार असल्याचे सांगण्यात आले होते. आता सरकारने याविषयीची अधिकृत घोषणा केली आहे. अर्थमंत्रालयाने शुक्रवारी याविषयीचे धोरण जाहीर केले. मुद्रा योजनेच्या माध्यमातून उद्दिष्ट पुढे घेऊन जायचे असल्याचे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले.
कोणाला होणार फायदा?
अर्थात मुद्रा लोनमधील या बदलाचा फायदा सर्वांनाच होईल असे नाही. ज्या तरूण उद्योजकांनी किंवा अगोदर ज्यांनी मुद्रा लोन घेतले होते आणि त्याची वेळेत परतफेड केली त्या सर्वांना मुद्रा लोनच्या बदलाचा फायदा होईल. त्यानुसार सध्याची मुद्रा लोनची मर्यादा 10 लाख रुपयांहून 20 लाख रुपये करण्यात येणार आहे. ज्यांनी मुद्रा लोन घेतले आणि त्याची परतफेड केली नाही. त्यांना त्याचा फायदा होणार नाही.
कर्ज मिळवायचे कसे?
बँका, वित्तीय संस्थांमध्ये कर्जासाठी चौकशी करु शकता. कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही अधिकृत संकेतस्थळ http://www.mudra.org.in/ ला भेट देऊ शकता. येथून अर्ज डाउनलोड करता येईल. त्यानंतर सर्व तपशील भरुन आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. पुढील सोपास्कार आणि प्रक्रिया संबंधित बँकेतील शाखा व्यवस्थापक करतो. या योजनेअंतर्गत तुम्ही 50 हजार ते 10 लाखांपर्यंत आर्थिक मदत घेऊन तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. या कर्ज योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे तुम्हाला कर्ज घेताना कुठलेही तारण द्यावे लागत नाही. प्रक्रिया शुल्कही अर्जदाराकडून घेण्यात येत नाही.