नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित एका कार्यक्रमात भारताच्या तंत्रज्ञानविषयक प्रगतीवर महत्त्वाचे मुद्दे मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात Call Before U Dig हे मोबाइल अॅपदेखील लाँच केलंय. मोदींनी लाँच केलेलं हे अॅप तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.
CBuD म्हणजेच Call Before U Dig हे एक मोबाइल अॅप्लिकेशन आहे. भारत सरकारच्या संचार मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाचा हा एक मोठा उपक्रम आहे. एखाद्या ठिकाणी काही विकास कामासाठी खोदकाम सुरु असेल तर जमीन खोदण्यापूर्वी त्या ठिकाणी खाली एखादे वीजेचे वायर किंवा टेलिकॉम कंपनीचे वायर किंवा एखादी पाइपलाइन गेलेली असेल, याविषयी हे अॅप माहिती देईल. आतापर्यंत खोदकाम करताना या गोष्टींचा थांगपत्ता लागणे कठीण होते. त्यामुळे जमिनीखालील केबल किंवा पाइपलाइन अनेकदा तुटण्याची किंवा फुटण्याच्या घटना घडत असत.
गतिशक्ती संचार पोर्टलनुसार, CBuD मोबाइल अॅपद्वारे जे लोक खोदकाम करत असतील किंवा जी कंपनी खोदकाम करत असेल, ते सदर परिसरातील अंडरग्राउंड केबल किंवा इतर माहिती त्याला आधी घेता येईल. तसेच या परिसरात ज्या कंपनीने आधी अंडरग्राउंड केबल किंवा पाइपलाइनचे काम केले असेल त्या कंपनीचे नाव, मोबाइल नंबर, ईमेल आयटी आणि काँन्टॅक्ट डीटेल्स इत्यादी माहिती मिळू शकते.
हे मोबाइल अॅप सक्रिय झाल्यानंतर एखाद्या भागात ज्या एजन्सी किंवा कंपनीने खोदकाम केले असेल तिच्याशी आधी संपर्क साधता येईल. त्यामुळे भविष्यातील नुकसान टाळता येईल.
Speaking at inauguration of ITU Area Office & Innovation Centre in Delhi. Initiatives like 6G Test Bed & ‘Call Before You Dig’ app are also being launched. https://t.co/z6hRdeTPbB
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2023
नरेंद्र मोदींच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज झालेल्या व्हिडिओतून या अॅपविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, देशात वर्षभरात 10 लाख केबलचं नुकसान होतं. यामुळे 400 मिलियन डॉलर अर्थात 3 हजार कोटी रुपयांचं नुकसान होतं. संबंधित परिसरातील नागरिकांना होणारा त्रास त्याहून जास्त असतो. मात्र हे अॅप लाँच झाल्यावर सदर नुकसान टाळता येऊ शकतं, असा दावा करण्यात आलाय.
विज्ञान भवनात आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी मोठी घोषणा केली. नरेंद्र मोदी यांनी इनोव्हेशन सेंटर आणि इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या नव्या प्रादेशिक कार्यालयाचंही उद्घाटन केलं. एकिकडे देशभरात 5G सेवेची पाळंमुळं रुजतायत तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6G टेस्टिंगची घोषणा केली आहे.